
वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी योजना तातडीने राबविण्याची मागणी विशेष उल्लेख सूचनेद्वारे आमदार सुनील शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनात केली होती. या मागणीची दखल घेत कामगार मंत्री अॅड. आकाश फुंडकर यांनी संबंधित कार्यवाहीबाबत पत्राद्वारे माहिती दिली आहे.
राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यास सरकारने 2024 मध्ये मंजुरी दिली असून या माध्यमातून ज्येष्ठ व गरजू विव्रेत्यांना निवृत्तीवेतन, आरोग्य विमा व उपचारासाठी आर्थिक मदत, पाल्यांच्या उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती तसेच स्टॉल व साधनसामग्रीसाठी अर्थसहाय्य मिळणे अपेक्षित आहे. त्याबाबत कार्यवाही सुरू असल्याचे मंत्र्यांनी सांगितले.
या योजनांचा लाभ मिळणार
कामगार मंत्र्यांच्या पत्रानुसार, सामाजिक सुरक्षा संहिता, 2020 अंतर्गत पात्र ठरणारे वृत्तपत्र विव्रेते हे राज्य असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा मंडळाच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ घेण्यास पात्र असतील. यात जीवन व अपंगत्व संरक्षण, आरोग्य व मातृत्व लाभ, वृद्धापकाळ संरक्षण, शिक्षण, भविष्य निर्वाह निधी, निवास, मुलांसाठी शैक्षणिक योजनांचा समावेश आहे.
वृत्तपत्र विक्रेत्यांकडून आभार
वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कल्याणासाठी विधान परिषदेत आवाज उठविल्याबद्दल आमदार सुनील शिंदे यांचे तसेच या मागणीची दखल घेऊन 7 सप्टेंबर 2026 रोजी पत्राद्वारे शासनाची भूमिका स्पष्ट केल्याबद्दल कामगार मंत्र्यांचे बृहन्मुंबई वृत्तपत्र विव्रेता संघाच्या वतीने कार्याध्यक्ष मधुसूदन सदडेकर व सरचिटणीस संजय चौकेकर यांनी आभार मानले.
























































