बँक बदलण्यासाठी फास्टॅगची ‘वन टॅग’ सुविधा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फास्टॅगचा वापर करणाऱ्या वाहनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. फास्टॅगशी संबंधित बँक बदलण्यासाठी आता वाहनावरील जुना फास्टॅग काढून नवीन फास्टॅग घेण्याची गरज लागणार नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 मध्ये वन टॅग ही नवीन सुविधा लाँच करत असल्याची घोषणा केली आहे. या सुविधेमुळे वाहनधारकांना आपला चालू एनईटीसी फास्टॅग कायम ठेवून त्याच फास्टॅगशी संबंधित बँक बदलता येईल.

वनटॅग ही सुविधा इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी संयुक्तपणे विकसित केली आहे. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे बँक बदलल्यानंतरही वाहनांवर लावलेला तोच फास्टॅग वापरता येणार आहे. आतापर्यंत एखाद्या ग्राहकाला फास्टॅगची बँक बदलायची असल्यास त्याला आधी जुना फास्टॅग बंद करावा लागत होता.

वन टॅग सुविधेमधील सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बँक बदलल्यानंतरही फास्टॅगचा टॅग आयडी आणि वाहनाचा नोंदणी क्रमांक बदलणार नाही. म्हणजेच वाहनांवर आधीपासून लावलेला फास्टॅग काढून नवीन फास्टॅग लावण्याची आवश्यकता राहणार नाही. फास्टॅग बदलताना जुन्या आणि नवीन बँकेची जबाबदारी वेगवेगळी असेल.