
तरुणांची लग्न जुळत नसल्याचा प्रश्न तरुण आणि समाजाच्या दृष्टीनं गभीर होत आहे. याकडे शासनकर्त्यांचे लक्ष वेधण्यासाठी सोलापुरात लग्नाळू युवकाने थेट बाशिंग बांधून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मारला आहे. किसन ननवरे असे या युवकाचे नाव आहे.
तरुणांची वय झाली. त्यांना रोजगार मिळत नाही आणि रोजगार नाही म्हणूनच लग्नही होत नाहीत, अशी स्थिती आहे. शिवाय सध्या लग्नासाठी मुली मिळत नाहीत, ही लग्नाळू मुलांसमोर मोठी समस्या आहे. याकडे वारंवार लक्ष वेधण्याचा प्रयत्न तरुणाईकडून झाला आहे. सोलापुरात लग्नाळू युवकानं सरकारी सर्वधर्मीय विवाह नोंदणी केंद्र सुरू झालं पाहिजे, अशी प्रमुख मागणी घेऊन आंदोलन सुरू केले आहे. लग्नासाठी शासनाने अडीच लाखांचे पॅकेज द्यावे, अशीही त्याची मागणी आहे.
किसन ननवरे हा सोलापूरच्या ग्रामीण भागातून आलेला युवक ठिय्या आंदोलनावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाला की, मुलींची संख्यात्मक कमतरता तर आहेच; याशिवाय मुलींच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. मुलांना नोकऱ्याच नाहीत. शेती असणाऱ्या मुलांची व्यथा आणखी वेगळी. मुली ग्रामीण भागात यायलाच तयार नाहीत. सरकारी नियमानुसार मुलांचे लग्नाचं वय २१, मी आता २८ वर्षांचा आहे. माझे अनेक मित्र माझ्यापेक्षाही दहा वर्षे आधीपासून वाट पाहत आहेत. त्यांचंही लग्न होईना म्हणून आता समाजासमोर आणि सरकारसमोर ही व्यथा मांडत आहे.




























































