महाराष्ट्रातील 83 तालुके पावसाअभावी महिनाभर कोरडे, दुष्काळ घोषित करा; मराठवाडा, विदर्भासह राज्यातील आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठवाडा, विदर्भासह राज्याच्या उर्वरित भागातील 83 तालुके गेली महिनाभर कोरडे आहेत. तिथे पाऊसच न झाल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांतील आकडेवारीनुसार 19 जिह्यांतील 83 तालुक्यांमध्ये गेली 30 ते 38 दिवस पाऊस झालेला नाही. त्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, अहिल्यानगर, नाशिक आणि धुळे या जिह्यांतील 32 तालुक्यांचा समावेश आहे. विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा आणि नागपूर जिह्यामधील 20 तालुक्यांमध्ये पावसाअभावी तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रही कोरडा दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करत आहे. मराठवाडय़ातील बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशीव, परभणी आणि जालना या जिह्यांतील 17 तालुक्यात महिनाभर अपेक्षित पाऊस झालेला नाही तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमधील 15 तालुके कोरडेठाक पडले आहेत.

प्रदीर्घ काळ पावसाचा खंड पडल्याने या तालुक्यांमधील शेतकरी हवालदिल झाला आहे. पिके सुकून गेली आहेत. पिण्याच्या पाण्याचेही हाल होत आहेत. अनेक भागांमध्ये टँकरद्वारे पिण्याचे पाणी पुरवले जात असून आधीपासूनच टँकरवर अवलंबून असलेल्या जिह्यांमधील टँकरची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या परिस्थितीची जाण करून देत या जिह्यांमधील सर्वपक्षीय आमदारांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून दुष्काळ घोषित करावा आणि शेतकऱयांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.