
अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद, बोरिवली शाखेतर्फे आयोजित कलारजनी या वार्षिक उपक्रमात असामान्य नाटय़कलाकर्तृत्वाचा गौरव करण्यात येतो. रंगभूमीवरील योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. 1 ऑक्टोबरला सायंकाळी 7 वाजता बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृहात हा सोहळा होणार आहे.
अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद, बोरिवली शाखेचे अध्यक्ष प्रभाकर (गोटय़ा) सावंत यांनी पुरस्कारांची घोषणा केली.व्यावसायिक रंगभूमीवरील योगदानासाठी संजय मोने यांना गौरविण्यात येईल. भालचंद्र कुबल यांना नाटय़समीक्षा पुरस्कार तर नाटय़संहिता लेखकासाठी क्षितिज पटवर्धन यांना पुरस्कार जाहीर झाला. आहे. केदार शिंदे यांना ‘लोकरंग पुरस्कार’ तर निवेदिता सराफ यांना ‘रंगप्रतिभा पुरस्कार’ जाहीर झाला आहे. ‘नाटय़रंग पुरस्कार’ ‘सांगत्ये ऐका’ नाटकाला जाहीर झाला. ‘बालरंग पुरस्कार’ रामनाथ थरवळ यांना तर ‘रंगप्रयोग पुरस्कार’ नंदलाल रेळे यांना जाहीर झाला. संगीत रंगभूमीवरील योगदानासाठी प्रियांका बर्वे, नभोनाटय़ातील योगदानासाठी संचित वर्तक यांना तसेच ‘कार्यरंग पुरस्कार’ विजय साळुंके यांना देण्यात येणार आहे.
























































