मुंबईत जाण्याबाबत आज निर्णय; अंतरवालीत बैठक, मनोज जरांगे यांचे मराठा समाजाला उपोषणस्थळी येण्याचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठा आरक्षणासाठी आता अटीतटीची लढाई सुरू झाली आहे. सरकार मुद्दाम मराठय़ांचा छळ करत आहे. हातात असूनही सरकारने 15 दिवसांत तोडगा काढला नाही. एकाही मराठय़ाने घरी बसू नये. आपल्याला मुंबईतील आंदोलनाचा निर्णय घ्यायचा आहे. त्यासाठी अंतरवालीत या, असे आवाहन मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.

मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज चौदावा दिवस असून त्यांची प्रकृती खंगली आहे. अशक्तपणामुळे त्यांचा आवाजही क्षीण झाला असून बोलताना श्वास लागत आहे. अशाही परिस्थितीत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सहज शक्य असतानाही सरकारने 15 दिवस मराठय़ांना खेळवले. आंदोलनावर तोडगा काढला नाही. आता अटीतटीची लढाई असून त्यासाठी मराठय़ांनी आंतरवालीत यावे. मुंबईत करण्यात येणाऱया आंदोलनाची रूपरेषा यावेळी ठरवण्यात येणार असून मार्गही निश्चित करण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.

कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी आज अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. सरकारने जरांगे यांना हात लावल्यास महाराष्ट्र येथे येईल, असा इशारा दीपके यांनी दिला.

गणेशोत्सवात विघ्न येणार नाही

आम्ही छत्रपती आणि हिंदू धर्माला मानणारे आहोत. त्यामुळे मुंबईत येणाऱया आंदोलकांकडून गणेशोत्सवात विघ्न येणार नाही, अशी हमीही मनोज जरांगे यांनी दिली. गणेशोत्सव हा अन्याय, अत्याचार दूर करण्यासाठी सुरू करण्यात आला. सरकारही आमच्यावर अत्याचारच करत आहे. त्यामुळेच आम्ही मुंबईत न्याय मागण्यासाठी येत आहोत, असेही मनोज जरांगे म्हणाले.

राज्यमंत्री योगेश कदम यांचा ताफा अडवला

धाराशीव मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या सुरू असलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर धाराशीव जिह्यातील मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचे शुक्रवारी दिसून आले. राज्यमंत्री योगेश कदम हे धाराशीवहून परंडय़ाकडे जात असताना मराठा आंदोलकांनी त्यांचा ताफा अडवून जोरदार घोषणाबाजी केली. अचानक ताफा अडवण्यात आल्याने काही काळ घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.