
हिंदुस्थान आणि रशिया यांच्यातील द्विपक्षीय संबंधांवरून काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. हिंदुस्थान आणि रशियामधील मजबूत संबंधांचा पाया हा १९५० च्या दशकापासूनचा म्हणजेच फार जुना आणि भक्कम असल्याचे सांगत, परराष्ट्र धोरणाच्या मुद्द्यावर केवळ स्वतःची प्रसिद्धी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
जयराम रमेश यांनी X वर एक पोस्ट करत असे म्हटले आहे. ते म्हणाले आहेत की, दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण आणि धोरणात्मक संबंधांचे मूळ भूतकाळातील मजबूत पायावर आधारलेले आहे. त्यामुळे सध्याच्या नेतृत्वाकडून या ऐतिहासिक संबंधांना नवीन वळण दिल्याचा दावा करत केवळ स्वतःची जाहिरातबाजी केली जात असल्याचा टोला त्यांनी लगावला. देशाच्या परराष्ट्र संबंधांची ही ऐतिहासिक पार्श्वभूमी नाकारता येणार नाही, असेही ते म्हणाले आहेत.





























































