भंडाऱ्यात ट्रक आणि पिकअप व्हॅनच्या धडकेत भीषण अपघात, तीन मुलांसह 8 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भंडारा जिल्ह्यात शुक्रवारी पहाटे एक भीषण अपघात घडला असून, ट्रक आणि पिकअप व्हॅनची समोरासमोर झालेल्या धडकेत तीन लहान मुलांसह आठ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या भीषण अपघातात अन्य तीन जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी साकोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, हा अपघात शुक्रवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगावजवळ घडला. छत्तीसगढमधील रायपूर येथून नागपूरच्या दिशेने प्रवास करणारी पिकअप व्हॅन समोरून येणाऱ्या आयशर ट्रकला धडकल्यामुळे हा अपघात झाला. लखनी तालुक्याजवळील मानेगाव आणि पिंपळगाव दरम्यान हा थरार घडला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य राबवले असून, याप्रकरणी पुढील कायदेशीर तपास सुरू आहे.