
दिल्लीत एक अतिशय दुर्मिळ आणि अचंबित करणारी वैद्यकीय घटना समोर आली आहे. वंध्यत्वाची तपासणी करण्यासाठी रुग्णालयात गेलेल्या 26 वर्षीय तरुणाच्या पोटात पूर्णपणे विकसित झालेले गर्भाशय आढळले आहे. आरजी हॉस्पिटल्स येथील मुख्य युरोलॉजिस्ट डॉ. सुशील खरबंदा यांनी या तरुणावर उपचार आणि शस्त्रक्रिया केली. हा तरुण सामान्य पुरुषांसारखेच जीवन जगत होता आणि त्याच्यामध्ये पुरुषांची सर्व सामान्य शारीरिक लक्षणे होती. त्याला या आजाराची कोणतीही पूर्वलक्षणे जाणवत नव्हती, अशी माहिती त्यांनी दिली. ‘इंडिया टूडे’ने याबाबत वृत्त दिले आहे.
शारीरिक तपासणी केली असता, पुरुषाच्या अंडकोषाच्या पिशवीत दोन्ही टेस्टीज अनुपस्थित असल्याचे आढळले. तसेच वीर्य तपासणीत एकही शुक्राणू आढळला नाही. गुणसूत्र चाचणी केली असता तो जनुकीयदृष्ट्या सामान्यए क्सवाय पुरुष असल्याचे स्पष्ट झाले. सोनोग्राफी आणि एमआरआय रिपोर्टमध्ये पोटात गर्भाशय असल्याचे निष्पन्न झाले. तसेच, त्याचे अंडकोष पोटातच राहिल्याने ते गर्भाशयाजवळ स्त्रीच्या अंडाशयासारखे दिसत होते.
आयएएसएच इन्स्टिट्यूट ऑफ अँड्रॉलॉजी अँड सेक्सुअल हेल्थचे संस्थापक डॉ. चिराग भंडारी यांनी सांगितले की, या दुर्मिळ स्थितीला वैद्यकीय भाषेत पर्सिस्टंट म्युलरियन डक्ट सिंड्रोम असे म्हणतात. सामान्यतः पुरुषाच्या भ्रूणाच्या विकासादरम्यान, टेस्टीजमधून स्रावणाऱ्या अँटी-म्युलरियन संप्रेरकामुळे गर्भाशय तयार करणाऱ्या नळ्या नष्ट होतात. परंतु, हे संप्रेरक पुरेसे तयार न झाल्यास किंवा शरीराने त्याला प्रतिसाद न दिल्यास, पुरुषाच्या शरीरात गर्भाशयाचा भाग तसाच राहतो. अंडकोष शरीराच्या पोटात राहिल्याने तेथील तापमान जास्त असते. यामुळे शुक्राणूंची निर्मिती होऊ शकत नाही.
डॉ. सुशील खरबंदा आणि त्यांच्या टीमने लॅपरोस्कोपीद्वारे पोटात असलेले गर्भाशय आणि दोन्ही टेस्टीज काढून टाकल्या.शरीराच्या आत अडकलेले अंडकोष आणि गर्भाशयामुळे भविष्यात कॅन्सर होण्याचा मोठा धोका असतो. बायोप्सी अहवालात कर्करोगाचे अत्यंत प्राथमिक/सूक्ष्म अंश आढळल्याने ही शस्त्रक्रिया वेळेवर झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
वैद्यकीय जगतात PMDS ही अतिशय दुर्मिळ स्थिती असून आतापर्यंत जगभरात अशी केवळ काही शेकडो प्रकरणे नोंदवली गेली आहेत. अशा प्रकरणांमध्ये केवळ आश्चर्य न व्यक्त करता जनुकशास्त्र, अँड्रॉलॉजी आणि प्रजनन तज्ज्ञांकडून सखोल तपासणी करणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.




























































