
विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामाकरीता रविवारी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.00 ते दुपारी 16.00 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. तसेच ठाणे आणि वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 16.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार असून, या कालावधीत या मार्गावरील लोकल सेवा बंद राहतील.
ब्लॉक कालावधीत सकाळी 10.43 ते दुपारी 15.53 या वेळेत मुलंड येथून सुटणाऱ्या डाऊन धीम्या/सेमी फास्ट लोकल सेवा मुलंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा आणि डोंबिवली स्थानकांवर थांबतील आणि आपल्या गंतव्यस्थानी नियोजित वेळेपेक्षा 10 मिनिटे उशिरा पोहोचतील.
सकाळी 10.36 ते दुपारी 15.51 या वेळेत कल्याण येथून सुटणाऱ्या अप धीम्या/सेमी फास्ट लोकल सेवा कल्याण आणि मुलंड स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा आणि ठाणे स्थानकांवर थांबतील आणि त्यानंतर मुलंड स्थानकावर पुन्हा अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या गंतव्यस्थानी नियोजित वेळेपेक्षा 10 मिनिटे उशिरा पोहोचतील.
सकाळी 11.00 ते सायंकाळी 17.00 या वेळेत सीएसएमटी मुंबई येथून सुटणाऱ्या किंवा तिथे येणाऱ्या सर्व अप आणि डाऊन धीम्या लोकल सेवा नियोजित वेळेपेक्षा 10 मिनिटे उशिरा पोहोचतील किंवा सुटतील.
ठाणे आणि वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 16.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. ब्लॉकच्या कालावधीत ठाणे आणि वाशी/नेरुळ/पनवेल स्थानकांदरम्यानची अप आणि डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा बंद राहील.
सकाळी 10.35 ते दुपारी 16.07 या वेळेत ठाणे येथून वाशी/नेरुळ/पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन ट्रान्स-हार्बर सेवा रद्द राहतील. सकाळी 10.25 ते दुपारी 16.09 या वेळेत पनवेल/नेरुळ/वाशी येथून ठाण्याकडे येणाऱ्या अप ट्रान्स-हार्बर सेवा रद्द राहतील. बेलापूर-उरण मार्गावरील गाड्या रविवारच्या वेळापत्रकानुसार चालवल्या जातील.
पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक नाही
गणेशोत्सवामुळे रविवारी 13 सप्टेंबर 2026 रोजी पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय विभागात कोणताही जंबो ब्लॉक घेण्यात येणार नाही.




























































