
हिंदुस्थानच्या ज्युनियर महिला हॉकी संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला 19-0 गोलफरकाने चिरडत ज्युनियर आशिया चषक हॉकी स्पर्धेत विक्रमी विजय मिळवला. पाकिस्तानला एकही गोल करता आला नाही. महिला ज्युनियर हॉकीच्या इतिहासातील हिंदुस्थानचा हा सर्वांत मोठा विजय ठरला. या दणदणीत विजयासह गतविजेत्या हिंदुस्थानने ज्युनियर आशिया कपच्या उपांत्य फेरीत धडक मारली.
हिंदुस्थानने सामन्याच्या पहिल्याच मिनिटापासून पाकिस्तानवर दबाव टाकला. पहिल्या दोन सत्रांत हिंदुस्थानने तब्बल 10 गोल डागले. पूजा मलिकने हॅटट्रिक नोंदवत पाकिस्तानच्या बचावफळीची पुरती भंबेरी उडवली. सानिका माने, मधू सिदार आणि सुप्रिया यांनी प्रत्येकी दोन गोल केले. रोशनी ऐंद हिनेही दोन गोल करत हिंदुस्थानच्या गोलवर्षावात भर घातली.
हिंदुस्थानने पहिल्याच क्वार्टरमध्ये पाच गोल ठोकले. पूजा साहूने सातव्या मिनिटाला हिंदुस्थानचे खाते उघडले. त्यानंतर रोशनी ऐंद, तनुश्री दिनेश कडू, सुखवीर काwर आणि सानिका माने यांनी गोल करत पाकिस्तानला सावरण्याची संधीच दिली नाही. दुसऱ्या क्वार्टरमध्ये मधू सिदार, गीता यादव, सानिका माने, तनुजा टोप्पो आणि पूजा मलिक यांनी गोल केल्याने मध्यंतराला हिंदुस्थानची आघाडी 10-0 अशी झाली.
उत्तरार्धातही हिंदुस्थानचा आक्रमक खेळ थांबला नाही. पूर्णिमा यादव, मधू सिदार आणि सुप्रिया यांनी तिसऱ्या क्वार्टरमध्ये गोल केले. अखेरच्या क्वार्टरमध्ये पृष्णा शर्मा, पूजा मलिक, सुप्रिया, बिनीमा धन आणि रोशनी ऐंद यांनी पाकिस्तानच्या जखमेवर गोलांची भर घातली. पूजा मलिकने 49 व्या आणि 51 व्या मिनिटाला गोल करत आपली हॅट्ट्रिक पूर्ण केली. रोशनीने 60 व्या मिनिटाला हिंदुस्थानचा 19 वा गोल नोंदवून पाकिस्तानचा पराभव अधिकच लाजिरवाणा केला.
हिंदुस्थानला 18 पेनल्टी कॉर्नर; पाकिस्तानला एकही नाही!
या सामन्यात हिंदुस्थानला तब्बल 18 पेनल्टी कॉर्नर आणि एक पेनल्टी स्ट्रोक मिळाला. यावरूनच हिंदुस्थानच्या वर्चस्वाची कल्पना येते. पाकिस्तानला मात्र संपूर्ण सामन्यात ना गोल करता आला, ना एकही पेनल्टी कॉर्नर किंवा पेनल्टी स्ट्रोक मिळवता आला.
गटातही हिंदुस्थानची धडाकेबाज कामगिरी
उपांत्यपूर्व फेरीपूर्वी हिंदुस्थानने गटफेरीतही आपला दबदबा कायम ठेवला होता. जपान, मलेशिया आणि दक्षिण कोरिया यांना पराभूत करत हिंदुस्थानने गटात अव्वल स्थान पटकावले. चीनविरुद्धचा सामना मात्र गोलशून्य बरोबरीत सुटला होता. आता उपांत्य फेरीत हिंदुस्थानचा सामना दक्षिण कोरिया आणि मलेशिया यांच्यातील उपांत्यपूर्व सामन्याच्या विजेत्याशी होणार आहे.
12 सप्टेंबरला हिंदुस्थानी संघ सेमीफायनलमध्ये उतरणार असून गतविजेतेपद राखण्यासाठी हिंदुस्थानी संघाने पाकिस्तानला 19 गोलांचा धडा शिकवत दणदणीत इशारा दिला आहे.

























































