भोकर-नांदेड रोडवर भीषण अपघात; ट्रक आणि मॅजिक वाहनाच्या धडकेत 6 ठार, 8 जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भोकर ते नांदेड मार्गावरील सिताखंडी परिसरात गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास ट्रक आणि मॅजिक वाहनाची भीषण धडक झाली. या धडकेत 6 जणांचा मृत्यू तर 8 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. जखमींना उपचारासाठी नांदेड येथील विविध खासगी व शासकीय रुग्णालयांत हलविण्यात आले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मॅजिक वाहन हे नांदेडहून भोकरच्या दिशेने जात होते. त्याचवेळी ट्रक भोकरकडून नांदेडकडे येत होता. सिताखंडी परिसरात दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली. धडक एवढी भीषण होती की, मॅजिक वाहनातील प्रवाशांना गंभीर दुखापत झाली.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती मिळते. दरम्यान, अपघातातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या अपघातात पांडुरंग लिंगुजी वाघमारे (55), लक्ष्मीबाई पांडुरंग पवार, शेख फेरोज (30), शेख अलतमेश शेख अलीमोद्दीन (25), बलवान पवार आणि अन्य एका महिलेचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे. मृतांची व जखमींची अधिकृत माहिती तसेच अपघाताचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.