महिलेच्या घरात रात्री घुसणे, तिच्या कपड्यांना स्पर्श करणे बलात्काराचा प्रयत्न नव्हे! उच्च न्यायालयाचा निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महिलेच्या घरात रात्री घुसणे आणि तिच्या कपड्यांना स्पर्श करणे म्हणजे बलात्काराचा प्रयत्न नव्हे असे महत्वपूर्ण निरीक्षण झारखंड उच्च न्यायालयाने नोंदवले. न्यायालयाने मूळ आरोपात बदल करून तो महिलेचा विनयभंग करणे अशा गुन्ह्यात रुपांतरित केला. 26 वर्षे जुन्या प्रकरणातील एका दोषी व्यक्तीच्या अपिलावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय बदलला.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, हा कथित गुन्हा 1999 मध्ये घडला होता. एका व्यक्तीने रात्री महिलेच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणावर सुनावणी करताना, यात बलात्काराचा गुन्हा सिद्ध होत नाही, असे निरीक्षण न्यायमूर्ती प्रदीप कुमार श्रीवास्तव यांनी नोंदवले.

केवळ रात्री महिलेच्या घरात घुसणे आणि तिच्या कपड्यांना स्पर्श करणे ही कृती भारतीय दंड संहितेनुसार बलात्कार किंवा बलात्काराचा प्रयत्न मानली जाऊ शकत नाही, असे झारखंड उच्च न्यायालयाने असे स्पष्ट केले. भारतीय दंड संहितेनुसार, बलात्काराच्या गुन्ह्याशी थेट संबंधित किंवा त्या दिशेने टाकलेले एखादे विशिष्ट प्रत्यक्ष पाऊल असल्याशिवाय केवळ कृतीवरून बलात्काराचा प्रयत्न सिद्ध होत नाही, असे न्यायालयाने नमूद केले.

पीडितेच्या साक्षीतून आरोपीची अशी कोणतीही विशिष्ट कृती दिसून येत नाही, जिचा अर्थ बलात्कार करण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल असा लावला जाऊ शकेल. तरीही, न्यायालयाने हे मान्य केले की आरोपीचे वर्तन अश्लील आणि आक्षेपार्ह होते, ज्यामुळे महिलेचा विनयभंग होण्याची शक्यता होती, असे उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.

सत्र न्यायालयाने 25 जुलै 2006 रोजी या व्यक्तीला चार वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. 27 डिसेंबर 1999 रोजी एफआयआर (FIR) दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली होती. अपीलकर्त्याने आदल्या रात्री तिच्या घरात घुसून बलात्कार करण्याच्या उद्देशाने तिच्या कपड्यांना स्पर्श केला होता, असा आरोप पीडितेने केला होता.