
अजित पवार गटाचे राज्यसभा खासदार पार्थ पवार यांच्यासंबंधीत मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. या प्रकरणात पार्थ पवारांना आरोपी का केले नाही? असा सवाल करत हायकोर्टाने पोलीस महासंचालकांकडे यासंबंधित उत्तर मागितले आहे. यामुळे राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार यांनी पार्थ पवारांना भाजपच्या राजकारणाची आठवण करून दिली. यासोबतच पार्थ पवारांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेण्याचा सल्ला दिला आहे.
रोहित पवार यांनी नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना या प्रकरणार भाष्य केलं. यावेळी ते म्हणाले की, मुंढवा प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. पण मला एवढंच वाटतं की पार्थ पवारांनी लवकरात लवकर एक पत्रकार परिषद घेऊन वस्तुस्थिती लोकांना सांगावी. पूर्वी अजित पवार असताना ते स्वत: मीडियासमोर जाऊन काय वस्तुस्थिती आहे हे सांगत होते. त्यामुळे पार्थ यांना येत्या दोन दिवसात आता पत्रकार परिषद घ्यावी लागेल, असे त्यांनी सांगितले.
या प्रकरणात कोर्टाने पोलिसांना प्रश्न केला आहे. पोलीस गृह खात्याचे अधिकारी आहेत. त्यामुळे आता पार्थ पवारांना खरं तर कळेल भाजपचं राजकारण काय आहे. या विषयामध्ये भाजप मित्र पक्षाच्या नेत्याला कसं अडचणीत आणतंय, हे लवकरच समजेल. या प्रकरणात गृह खात्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीस आहेत. अर्थ खातं अजित पवारांच्या पक्षाकडे आहे. पण अजितदादा गेल्यानंतर हे खातं फडणवीसांनी स्वत:कडे घेतलं. या प्रकरणात वाटाघाटींमध्ये अर्थखातं कायमस्वरूपी भाजपाकडे जाईल, असं मला वाटतंय. त्यामुळे येत्या काळात अजित पवारांच्या पक्षाला भाजपाचं राजकारण काय असतं हे फार जवळून समजेल, असा दावा रोहित पवार यांनी केला.
























































