आखातात पुन्हा युद्ध भडकले; अमेरिकेच्या हल्ल्याला इराणचे जोरदार प्रत्युत्तर, जॉर्डनमधील तळावर डागली 20 मिसाइल्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिका-इराणमध्ये पुन्हा ठिणगी पडली असून मध्यपूर्वेतील तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. मंगळवारी अमेरिकन सैन्याने इराणशी संबंधित पाच तेल टँकर्सवर हल्ला केला. त्यानंतर काही तासांतच इराणने जॉर्डनमधील अमेरिकन लष्करी तळाच्या दिशेने 20 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागल्याने मध्यपूर्वेतील टेन्शन पुन्हा वाढले आहे.

अमेरिकन नौदलाच्या युद्धनौकेला लक्ष्य केल्याचे सांगत अमेरिकन सैन्याने इराणच्या तेल टँकर्सवर हल्ला केला. अमेरिकेच्या या हल्ल्यानंतर इराणने ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’मध्ये 10 जहाजांवर हल्ला केल्याचा दावा केला. यामध्ये अमेरिकेच्या दोन जहाजांचा आणि आठ तेल टँकर्सचा समावेश होता. ही जहाजे प्रतिबंधित क्षेत्रातून जात होती, असे सांगत इराणने हल्ल्याचे समर्थन केले.

अमेरिकन जहाजे रडारवर

अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणने कुवेत आणि बहरीनच्या बंदरांजवळ असलेल्या अमेरिकन तेल टँकर्सकडे मोर्चा वळवला आहे. जहाजे बंदरात असोत किंवा समुद्रात, त्यांना लक्ष्य केले जाऊ शकते. होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिकेचे पाण्याखालील ड्रोन ताब्यात घेतल्याचा दावाही इराणने केला.

इराणच्या खार्ग बेटावर हल्ला

अमेरिकेच्या सैन्याने ओमानच्या आखातात 4 तेल टँकर्सना लक्ष्य केले, तर एका टँकरवर इराणच्या खार्ग बेटाजवळ हल्ला करण्यात आला. खार्ग बेट हे इराणचे सर्वात मोठे तेल निर्यात केंद्र आहे. ज्या पाच टँकर्सवर हल्ला करण्यात आला, ते अब्जावधी डॉलर्सच्या एका गुप्त नेटवर्कचा भाग होते. हे नेटवर्क इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्स आणि त्याच्या प्रादेशिक मित्रपक्षांसाठी निधी गोळा करते.

‘कसं चाललंय ट्रम्प?’ इराणने डिवचले

तणावाच्या पार्श्वभूमीवर ट्युनिशियातील इराणच्या दूतावासाने बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा मीम शेअर करत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना चिमटा काढला. इराणने अमेरिकेचे पाण्याखालील ड्रोन ताब्यात घेतल्याचा दावा केल्यानंतर दूतावासाने हा मीम शेअर केला. दूतावासाने लिहिले, ‘‘पाण्याखाली एक ड्रोन हरवले. तेलाच्या किमती 100 डॉलरच्या जवळ पोहोचल्या आहेत. निवडणुका जवळ आल्या आहेत. कसं चाललंय ट्रम्प?’’