
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी ही परीक्षा 25 ऑक्टोबर 2026 रोजी आयोजित केली जाणार होती. मात्र, आता नव्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा 3 जानेवारी 2027 रोजी राज्यातील सर्व जिल्हा केंद्रांवर पार पडणार आहे. परीक्षेच्या दिनांकासंदर्भातील शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
लोकसेवा आयोगाने स्पष्ट केले आहे की, परीक्षेचे नियोजन शांततापूर्ण, सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीने व्हावे यासाठी विविध प्रशासकीय आणि स्थानिक बाबींचा आढावा घेण्यात आला. राज्यातील विविध जिल्ह्यांमधील परीक्षा उपकेंद्रांची उपलब्धता आणि जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेले अहवाल, सणांचा कालावधी, स्थानिक परिस्थिती, वाहतूक व्यवस्था आणि उमेदवारांना परीक्षा केंद्रांवर सुरक्षित व वेळेत पोहोचण्यासाठी येणाऱया अडचणी तसेच राज्य सेवा (मुख्य) परीक्षा 2026 चे नियोजन, इतर भरती संस्थांच्या परीक्षांचे वेळापत्रक आणि राज्य शासनाचे हिवाळी अधिवेशन आदी कारणांमुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.






















































