निवडणूक आयोगाचा ‘भारतरत्ना’ला धक्का, ‘एसआयआर’वरून सी.एन.आर. राव यांना नोटीस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मतदार फेरतपासणी (एसआयआर) प्रक्रियेतील त्रुटींचा फटका केवळ सर्वसामान्यांनाच होतो आहे असे नाही. ‘भारतरत्न’ म्हणून गौरवण्यात आलेले 92 वर्षीय शास्त्रज्ञ सीएन आर. राव यांनाही निवडणूक आयोगाने धक्का दिला आहे. नावात विसंगती आढळल्याने आयोगाने राव यांना नोटीस बजावली आहे.

सीएन आर. राव हे बंगळुरूमध्ये वास्तव्यास आहेत. 2002 च्या मतदार यादीत त्यांचे नाव इंग्रजीत नमूद आहे. त्यांच्या नावापुढे Prof. असा शब्द आहे. नव्या यादीतही त्याच पद्धतीने हे नाव आहे. मात्र, प्रोफेसर हा शब्द संक्षिप्त इंग्रजीत लिहिताना तो Proff. असा लिहिला गेला आहे. म्हणजे त्यात ‘एफ’ हे अक्षर दोनदा आले आहे. त्यावरून निवडणूक आयोगाने त्यांना खुलासा करण्यासाठी नोटीस बजावली. नियमानुसार खुलाशासाठी प्रत्यक्ष मतदाराने येणे अपेक्षित आहे. त्यानुसार राव यांना इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सजवळ मल्लेश्वरम येथे हजर राहण्यास सांगण्यात आले.

यापूर्वी नोबेल विजेते अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांनाही नावातील चुकीसाठी निवडणूक आयोगाने नोटीस बजावली होती. त्यावरून टीका होताच आयोगाने त्यांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्यापासून सूट दिली होती.

घरी जाऊन पडताळणी करणार; आयोगाचे स्पष्टीकरण

राव यांना नोटीस बजावल्याच्या चर्चेनंतर निवडणूक आयोगावर टीकेची झोड उठली. टीका होताच निवडणूक  अधिकाऱ्यांनी तातडीने खुलासा केला. राव यांना बीएलओने कसलीही नोटीस बजावलेली नाही. आमचे अधिकारी स्वतः त्यांच्या घरी जातील आणि त्यांच्या नावातील विसंगतीची पडताळणी करून पुढील कार्यवाही करतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.