23 व्या वर्षीही तंदुरुस्त, अभेडाच्या ‘महक’ वाघिणीच्या दीर्घायुष्याचे गुपित लवकरच उलगडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजस्थानच्या कोटा येथील अभेडा बायोलॉजिकल पार्कमधील ‘महक’ वाघीण सध्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनली आहे. 28 ऑगस्ट रोजी महक 23 वर्षांची झाली असून, ती देशातील सर्वाधिक काळ जगणारी वाघीण आहे. 23 व्या वर्षीही महक निरोगी आणि सक्रिय आहे. वाघांचे सरासरी वय पाहता महक वाघीणीच्या दीर्घायुष्यामागील रहस्य वैज्ञानिक उलगडणार आहेत. भारतीय वन्यजीव संस्थेचे (WII) शास्त्रज्ञ महकवर संशोधन करणार आहेत.

महकच्या दिर्घायुष्यामागील रहस्य जाणून घेण्यासाठी तिची जनुकीय रचना, डीएनए, तिच्या शरीरातील जैविक प्रक्रिया, तिचा आहार, लसीकरण आणि आरोग्यसेवा यांचा सखोल अभ्यास केला जाईल. वाढत्या वयानंतरही महकमध्ये असे कोणते विशिष्ट जनुक आहे का, ज्यामुळे ती वयाशी संबंधित आजारांपासून सुरक्षित राहिली आहे, हे निश्चित करणे हा या संशोधनाचा सर्वात महत्त्वाचा भाग असेल.

पिंजऱ्यातील वाघांचे आयुर्मान साधारणपणे 16 ते 18 वर्षे मानले जाते. जंगलात, शिकार, इतर प्राण्यांशी संघर्ष आणि इतर विविध धोक्यांमुळे त्यांचे आयुर्मान आणखी कमी असू शकते. अशा परिस्थितीत, महक वयाच्या 23 व्या वर्षीही तंदुरुस्त आहे.

महकचा जन्म 28 ऑगस्ट 2004 रोजी जयपूरच्या नाहरगड जैविक उद्यानात झाला. ती कधीही मोकळ्या जंगलात राहिलेली नाही. असे असूनही, वयाच्या 23 व्या वर्षीही तिचे दात आणि नखे मजबूत आहेत आणि ती अजूनही सक्रिय आहे. मेहकवरील संशोधन केवळ तिच्याबद्दल माहिती गोळा करण्यापुरते मर्यादित राहणार नाही. तिच्या दीर्घायुष्यामागील आणि उत्तम आरोग्यामागील कारणे उघड झाल्यास देशातील इतर प्राणिसंग्रहालयांना त्याचा फायदा होऊ शकतो.

या माहितीच्या आधारे, वृद्ध वाघांच्या देखभालीसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे विकसित केली जातील. महकचे अवयव, दात आणि नखे यांच्या कार्याचा अभ्यास करणे देखील महत्त्वाचे मानले जाते. यामुळे वृद्ध वाघांच्या, तसेच सिंह आणि बिबट्यांच्या उपचारांमध्ये मदत होऊ शकते. शिवाय, महकच्या तणावमुक्त जीवनाचा आणि वर्तनाचा अभ्यास वन्यजीवांच्या मानसिक आरोग्याबद्दल समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.