
हिंदुस्थानी पॅरा तिरंदाजांनी प्रतिस्पर्ध्यांना आपल्या अचूक नेमबाजीने चीतपट करत जागतिक तिरंदाजी पॅरा सीरिजच्या तिसऱ्या टप्प्यात मंगळवारी रणांगण गाजविले. हिंदुस्थानने दोन सुवर्ण आणि एका रौप्यपदकाची कमाई करत आपला दबदबा कायम ठेवला.
तोमन–श्याम सुंदरची सुवर्णभेदी कामगिरी
पुरुषांच्या कंपाऊंडमध्ये अंतिम सामन्यात तोमन कुमार आणि श्याम सुंदर स्वामी या हिंदुस्थानी जोडीने इराकच्या अब्बास काधिम आणि अनवर अलदावोद यांना 152-139 असे पराभूत करत सुवर्णपदकावर नाव कोरले. सुरुवातीच्या बाणावर 8 गुणांची नोंद झाल्याने हिंदुस्थानी जोडीची सुरुवात काहीशी डळमळीत झाली. मात्र, त्यानंतर नेम साधत हिंदुस्थानी तिरंदाजांनी पुढील 12 बाणांमध्ये केवळ पाच गुण गमावले आणि सामन्यावर घट्ट पकड मिळवली.
भावना–पूजेचे रूपेरी यश
महिलांच्या रिकर्व्हच्या अंतिम फेरीत मात्र हिंदुस्थानला चीनच्या भेदक नेमबाजीसमोर टिकता आले नाही. भावना आणि पूजा या जोडीचा चीनकडून 0-6 असा पराभव झाला. 23-34, 33-35 आणि 30-31 अशा गुणफरकाने चीनने सामना जिंकलाआणि त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
महिलांच्या पंपाऊंड संघाच्या कांस्यपदकाच्या लढतीत शीतल देवी आणि पायल नाग या हिंदुस्थानी जोडीलाही चीनने रोखले. मात्र, तिसऱ्या एण्डमध्ये हिंदुस्थानची कामगिरी ढासळली आणि चीनने आघाडी वाढवत कांस्यपदकावर कब्जा केला.
हरविंदर–सुंडीची पिछाडीनंतर विजयी मुसंडी
पुरुषांच्या रिकर्व्हच्या अंतिम लढतीत हरविंदर सिंग आणि विजय सुंडी या हिंदुस्थानी तिरंदाजांनी स्लोव्हाकियाच्या डेव्हिड इवान आणि डेनिस इवान यांचा 6-2 असा पराभव केला. पहिला सेट 34-37 असा गमावल्यानंतर हिंदुस्थानी जोडीने जबरदस्त पुनरागमन केले आणि सलग तीन सेट जिंकत सुवर्णपदकावर कब्जा केला. तिसऱ्या सेटमध्ये हरविंदरने सलग तीन ‘10’ साधत सामन्याची दिशाच बदलली आणि विजयावर शिक्कामोर्तब केले.



























































