
तेलंगणा विधानसभेच्या परिसरात मंगळवारी एक थरारक घटना घडली. वरिष्ठ आयएएस अधिकारी नवीन मित्तल यांचे स्वीय सहाय्यक राजू हे अचानक चक्कर येऊन जमिनीवर कोसळले. या कठीण प्रसंगी कोणताही विलंब न करता तेलंगणा सरकारमधील मंत्री वाकिती श्रीहरी यांनी स्वतः पुढे होत राजू यांना तत्काळ सीपीआर दिला. मंत्र्यांच्या या समयसूचकतेमुळे अधिकाऱ्याचे प्राण वाचले. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ‘पीटीआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.
मंगळवारी नेहमीप्रमाणे विधानसभेचे कामकाज सुरू असताना परिसर आणि लॉबीमध्ये मोठी वर्दळ होती. याच दरम्यान आयएएस अधिकारी नवीन मित्तल यांचे पीएस राजू यांना चक्कर आली आणि ते खाली कोसळले. हे दृश्य पाहून आजूबाजूला उपस्थित असलेल्या लोकांची एकच धावपळ उडाली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जवळच उभे असलेले मंत्री वाकिती श्रीहरी यांनी क्षणाचाही विलंब न लावता राजू यांच्याकडे धाव घेतली. राजू यांच्या छातीवर दाब देऊन त्यांनी तातडीने सीपीआर देण्यास सुरुवात केली.
VIDEO | Hyderabad: Telangana Minister Vakiti Srihari gives CPR to Principal Secretary Navin Mittal’s PS after he collapsed in the Assembly.
(Source: Third Party)
(Full video available on PTI Videos – https://t.co/d8jp61yd2p) pic.twitter.com/e98XMHqh8w
— Press Trust of India (@PTI_News) September 8, 2026
आणीबाणीची परिस्थिती ओळखून विधानसभेतील वैद्यकीय पथकाला तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आले. प्राथमिक उपचार आणि आपत्कालीन वैद्यकीय मदत दिल्यानंतर राजू यांना पुढील उपचारासाठी तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. राजू यांच्या अचानक कोसळण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, डॉक्टर त्यांच्या प्रकृतीची तपासणी करत आहेत.
दरम्यान, एकीकडे या वैद्यकीय आणीबाणीमुळे सभागृहाबाहेर भीतीचे वातावरण होते, तर दुसरीकडे विधानसभेत राजकीय वाद पेटल्याचे पाहायला मिळाले. भारत राष्ट्र समिती आमदारांवरील कथित कारवाई आणि सभापतींवरील टिप्पणीवरून लागोपाठ दुसऱ्या दिवशी विधानसभेचे कामकाज बाधित झाले. बीआरएसचे विधान परिषद सदस्य ताठा मधुसूदन यांनी विधानसभा सभापती गड्डम प्रसाद कुमार यांच्याविरोधात कथित अपशब्द वापरल्याचा आरोप आहे. या मुद्द्यावरून सभागृहात तीव्र पडसाद उमटले.
























































