रिल्स पाहण्याच्या व्यसनापायी जीवन संपवले, इंटरनेट खंडित झाल्याने महिलेने उचलले टोकाचे पाऊल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोबाईलवर रील्स पाहण्याचे व्यसन असलेल्या एका ५२ वर्षीय महिलेने इंटरनेट नेटवर्क वारंवार खंडित होत असल्याच्या रागातून विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात घडली आहे.

मंगलो बाई सारथी (वय ५२) असे मृत महिलेचे नाव असून त्या करतला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केराकाछार गावातील रहिवासी होत्या. शनिवारी त्यांनी राहत्या घरी कीटकनाशक प्यायले होते, त्यानंतर उपचारादरम्यान सोमवारी त्यांचा मृत्यू झाला.

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगलो बाई यांना मोबाईलवर रील्स पाहण्याचे प्रचंड व्यसन होते. शनिवारी त्या मोबाईलवर रील्स पाहत असताना वारंवार इंटरनेट नेटवर्क जात होते आणि व्हिडिओ अडकत होते. यामुळे संतप्त झालेल्या मंगलो बाई यांनी आधी रागाच्या भरात आपला मोबाईल जमिनीवर आपटून फोडला. त्यानंतर घरात ठेवलेले कीटकनाशक प्राशन केले.

त्यांची प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच १७ वर्षीय मुलीने घरातील इतरांना याची माहिती दिली. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने करतला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कोरबा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे उपचार सुरू असताना सोमवारी त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर पोलिसांनी महिलेचा मृतदेह तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.