
नवी कोरी करकरीत महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी कुणी क्रेनने उचलून थेट बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर पार्क करेल का… तर याचे उत्तर बहुतांश लोक नाही असेच देतील. पण बिहारमध्ये एका तरुणाने चक्क आपली स्कॉर्पिओ गाडी बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर पार्क करून असेही घडू शकते हे दाखवून दिले. अर्थात यामागील कारणही विचित्र असून ते ऐकून अनेकांनी आपल्या डोक्याला हात मारला आहे.
खरे तर गाडी चोरीला जाऊ नये म्हणून लोक सुरक्षेसाठी अलार्म, सेंट्रल लॉकिंग किंवा गॅरेजचा वापर करतात. मात्र, बिहारमधील गोपाळगंज जिल्ह्यात एका व्यक्तीने आपली नवी कोरी गाडी चोरांपासून वाचवण्यासाठी अनोखी क्लृप्ति शोधून काढली आणि त्याचीच सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. मनोज यादव नावाच्या व्यक्तीने चक्क क्रेनच्या साहाय्याने आपली नवी महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिक SUV थेट घराच्या दुसऱ्या मजल्यावरील छतावर नेऊन पार्क केली आहे.
मनोज हे कामानिमित्त इस्रायलमध्ये राहतात. त्यांनी काही दिवसांपूर्वीच महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिक SUV खरेदी केली होती. परदेशात जाण्यापूर्वी त्यांनी गाडीची देखभाल करण्यासाठी एका चालकाची नेमणूक केली होती. मात्र, काही कारणास्तव चालकाने नोकरी सोडली. चालक निघून गेल्यानंतर घरासमोर उभी असलेली महागडी गाडी चोरीला जाण्याची भीती यादव कुटुंबाला वाटू लागली. यावर उपाय म्हणून त्यांनी गाडी सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा निर्णय घेतला आणि थेट छतावरच गाडी पार्क करण्याची योजना आखली.
गाडी चोरीला जाऊ नये म्हणून लोक सुरक्षेसाठी अलार्म, सेंट्रल लॉकिंग किंवा गॅरेजचा वापर करतात. मात्र, बिहारमधील एका व्यक्तीने स्कॉर्पिओ क्रेनने उचलून थेट बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर पार्क केली. pic.twitter.com/yEFlBJ9JUf
— Saamana Online (@SaamanaOnline) September 8, 2026
नुकत्याच समोर आलेल्या व्हिडिओमध्ये एक मोठी क्रेन या महिंद्रा स्कॉर्पिओला हवेत उचलताना दिसत आहे. अत्यंत सावधगिरी बाळगत ही SUV दोन मजली इमारतीच्या छतावर सुरक्षितपणे उतरवण्यात आली. छतावरची स्कॉर्पिओ पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून नेटकऱ्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.
दरम्यान, 1.8 ते 2 टन वजनाची ही SUV छतावर ठेवल्याने घराच्या स्ट्रक्चरल लोड-बेअरिंग क्षमतेवर काय परिणाम होईल किंवा हे कितपत सुरक्षित आहे असा सवालही उपस्थित होत आहे.

























































