
ज्युनियर हॉकी आशिया चषक स्पर्धेत हिंदुस्थानच्या पुरुष संघाने दक्षिण कोरियाचा पराभव केला आहे. कर्णधार अनमोल एक्काच्या दुहेरी गोलच्या बळावर आणि शेवटच्या 15 मिनिटांत केलेल्या जोरदार आक्रमणाच्या बळावर हिंदुस्थानने दक्षिण कोरियावर 7-3 असा विजय मिळवला. या विजयासह गतविजेत्या हिंदुस्थानने उपांत्य फेरीतील आपले स्थान जवळजवळ निश्चित केले आहे.
सामन्याच्या सुरुवातीपासून हिंदुस्थानने दक्षिण कोरियाच्या गोल पोस्टवर आक्रमण केले. याचा फायदा पाचव्या मिनिटाला झाला आणि कर्णधार अनमोल एक्काने पेनल्टी कॉर्नरचे रुपांतर गोलमध्ये करत हिंदुस्थानला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. पण पुढच्याच मिनिटाला कोरियाच्या डोह्यॉन चोई याने गोल करत 1-1 अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर 18 व्या मिनिटाला लव्हनूर सिंगने मैदानी गोल करत हिंदुस्थानची आघाडी 2-1 अशी केली. मात्र 60 सेकंदाच्या आता कोरियाच्या ह्योकगुन यूने गोल करत सामना पुन्हा 2-2 असा बरोबरीत आणला.
20 व्या मिनिटाला अजित यादव याने गोल करत हिंदुस्थानला 3-2 अशी आघाडी मिळवून दिली. मध्यांतरापर्यंत हिंदुस्थान आघाडीवर होता. त्यानंतर तिसऱ्या क्वार्टरमध्ये कोरियाने पुनरागमन केले. 24 व्या मिनिटाला ह्योकगुक यूने सामन्यातील दुसरा गोल केला आणि पुन्हा सामना 3-3 असा बरोबरीत आला. 42 व्या मिनिटाला प्रभदीप सिंग याने गोल करत हिंदुस्थानला पुन्हा आघाडी मिळवून दिली. त्यानंतर शेवटच्या क्वार्टरमध्ये हिंदुस्थानने कोरियाच्या गोल पोस्टवर एकामागोमाग हल्ले करत तीन मिनिटात तीन गोल केले आणि सामना 7-3 अशा फरकाने जिंकला.
🏑🔥 MOMENTS OF THE MATCH! 🇮🇳🇰🇷
Relive the best moments from an action-packed clash at the 2026 Men’s Junior Asia Cup! 🏆🌏
🇮🇳 India 7–3 Korea 🇰🇷
⚡ Goals. Skills. Saves. Passion.
A strong performance from India on the Asian stage! 👏🔥 pic.twitter.com/3fltiGEWsz— Asian Hockey Federation (@asia_hockey) September 8, 2026
तीन सामन्यांनंतर दोन विजय आणि एका बरोबरीसह हिंदुस्थानचे आता एकूण 7 गुण झाले आहेत. बुधवारी होणाऱ्या आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात हिंदुस्थानपुढे चिनी तैपेईचे आव्हान आहे. हा सामना जिंकल्यास हिंदुस्थान उपांत्य फेरीत प्रवेश करेल.
दरम्यान, दक्षिण कोरियाचा हा या स्पर्धेतील पहिला पराभव असून त्यांच्या खात्यात 6 गुण आहेत. उपांत्य फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी त्यांना जपानविरुद्धचा पुढील सामना जिंकणे अनिवार्य आहे.


























































