
इन्स्टाग्रामवर रील बनवण्यासाठी एका तरुणाला स्टंट करणे चांगलेच भोवले आहे. तब्बल 30 फूट उंचीवरून पाण्यात उडी मारली. मात्र ज्या ठिकाणी उडी मारली. त्या ठिकाणी पाणी कमी असल्याने तरुणाच्या दोन्ही पायांना फ्रॅक्चर झाले आहे. आता या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पुष्पेंद्र कुमार मनौरिया असे या तरुणाचे नाव असून हा तरुण मित्रांसोबत पहूज धरणावर फिरायला गेला होता. रील बनवण्यासाठी त्याने धरणाच्या ह्यू पॉइंटवरून थेट उडी मारली. त्याच्या मित्रांनी ही संपूर्ण घटना मोबाइलच्या कॅमेऱ्यात कैद केली. दुखापत झाल्याने तरुणाला पाण्यातून बाहेर काढणे अशक्य झाले तो बुडू लागला. हे पाहून जवळपासच्या लोकांनी त्याला कसेबसे पाण्याच्या बाहेर काढले. जखमी पुष्पेंद्रला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अशा प्रकारे जीव धोक्यात घालून स्टंट करणे अत्यंत धोकादायक असून यापुढे असा स्टंट कधीही करणार नाही, असे तो म्हणाला.
























































