हिंदुस्थानी पॅरा तिरंदाजांचा अचूक निशाणा, शीतल देवी कंपाऊंडमध्येही पदकाच्या दिशेने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जागतिक तिरंदाजी पॅरा सीरिजच्या तिसऱ्या टप्प्यात हिंदुस्थानच्या पॅरा तिरंदाजांनी दुसऱ्या दिवशी मैदानावर आपला दबदबा दाखवला. युगल गर्ग, पवन कुमार आणि तंवी इंगले यांनी उपांत्य फेरी गाठत हिंदुस्थानची किमान दोन पदके निश्चित केली. कंपाऊंड प्रकारातही हिंदुस्थानी तिरंदाजांनी पात्रता फेरीत वर्चस्व गाजवत पदकांच्या दिशेने जोरदार कूच केले.

जगातील अव्वल क्रमांकाची आणि विद्यमान जगज्जेती शीतल देवीने महिला कंपाऊंड पात्रता फेरीत 720 पैकी तब्बल 698 गुण मिळवत अव्वल मानांकन पटकावले. हात नसतानाही शीतलने दाखवलेल्या या अचूक निशाण्याने प्रतिस्पर्ध्यांना धडकी भरवली.

हिंदुस्थानच्या लालपतीने 11वे, सरिताने 12वे आणि पायल नागने 14 वे मानांकन मिळवत अंतिम 16च्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. पायलने स्लोव्हाकियाच्या डॉमिनिका पेट्रोविकोव्हाचा 140-131 असा पराभव केला. महिला कंपाऊंड सांघिक पात्रता फेरीतही हिंदुस्थानने 1,368 गुणांसह अव्वल स्थान पटकावले. शीतल, लालपती आणि सरिता यांच्या हिंदुस्थानी त्रिकुटाला थेट उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला आहे. त्यामुळे पदक निश्चित करण्यासाठी आता केवळ एका विजयाची गरज आहे.

राकेशचीही दमदार झेप

पुरुष कंपाऊंडमध्ये पॅरिस पॅरालिम्पिकचा कांस्यपदक विजेता राकेश कुमारने 702 गुणांसह दुसरे मानांकन मिळवले. तो अव्वल मानांकित इंडोनेशियाच्या केन स्वागुमिलांगपेक्षा अवघ्या दोन गुणांनी मागे राहिला. विद्यमान जगज्जेता आणि जागतिक क्रमवारीतील अव्वल तिरंदाज तोमन कुमार चौथ्या स्थानावर राहिला. गुरविंदर सिंह आठवा, तर श्याम सुंदर स्वामी 13वा राहिला.

कंपाऊंडमध्ये हिंदुस्थानचे वर्चस्व

पुरुष कंपाऊंड सांघिक पात्रता फेरीत हिंदुस्थानने 1,398 गुणांसह अव्वल स्थान पटकावत थेट उपांत्य फेरी गाठली. मिश्र कंपाऊंड सांघिक प्रकारात हिंदुस्थानची शीतल देवी आणि तोमन कुमार ही जोडी थेट उपांत्यपूर्व फेरीपासून मोहिमेला सुरुवात करेल.