
पुण्यात डीजेच्या बंदीवरून रान उठले असतानाच आता पुण्यातील एका महिलेने धक्कादायक दावा केला आहे. डीजेविरोधात भूमिका घेतल्याने आजूबाजूच्या लोकांनी आम्हाला वाळीत टाकले आहे. ज्या मैत्रिणी होत्या, त्यांनीही माझ्याशी बोलणे सोडले आहे, अशी खंत पुण्यात राहणाऱ्या वर्षा कदम या महिलेनी व्यक्त केली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना वर्षा कदम यांनी हा दावा केला आहे.
डीजे बंद झाला पाहिजे. आमच्या घराच्या खिडक्यांना ज्या काचा आहेत त्या डॉल्बीच्या आवाजामुळे थरथर करतात. जमिनीवरही तसाच अनुभव येतो. माझे वडील आजारी होते. मी त्यांना इथे राहायला आणले होते, पण त्यानंतर गावाला घेऊन गेले. तेव्हा ते तिथे सीरियस झाले होते, त्यांना धाप वगैरे लागत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना मोठी धाप लागली. गावातल्या एका माणसाला गाडी घेऊन बोलवेपर्यंत माझे वडील माझ्या डोळ्यांच्या देखत गेले. माझे वडील सीरियस होते, जास्त दिवस जगणार नव्हते, पण शेवटच्या काही दिवसांमध्येही त्यांना सुखाने राहता आले नाही. कारण डीजेचा प्रचंड त्रास त्यांना झाला होता. मी पहिल्या मजल्यावर घर घेतले ते वडिलांसाठी, कुटुंबासाठी. जर त्यांनाच शांतता मिळणार नसेल तर या घराचा काय उपयोग आहे? असे वर्षा कदम यांनी म्हटले.
घर विकण्यासाठी दबाव
पहिल्या मजल्यावर घर कशाला घेतलं? तुला डीजेचा त्रास होतो आहे तर घर विकून टाक हे मला वारंवार सांगण्यात येते. मी माझं घर का विकायचं? त्यापेक्षा डीजे आणि लाऊड स्पीकरचा आवाज का बंद केला जात नाही? आमच्या सोसायटीत डीजेविरोधात बोलू देत नाहीत. वडिलांना त्रास होतोय म्हणून दहा वर्षे वडिलांच्या खोलीची खिडकी उघडली नसल्याचे त्यांनी सांगितले. आम्हाला त्रास होतो म्हणून डीजेविरोधात बोललो तर धर्माच्या विरोधात बोलता असा आरोप केला जातो असेही त्या म्हणाल्या.

























































