
तमिळनाडू विधानसभेत मंगळवारी अभूतपूर्व गोंधळ आणि गदारोळ पाहायला मिळाला. मुख्यमंत्री विजय यांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या कागदपत्रांचा हवाला देत द्रविड मुन्नेत्र कजगम (द्रमुक) सरकारच्या कार्यकाळातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा उल्लेख केल्यामुळे द्रमुकच्या आमदारांनी आक्रमक पवित्रा घेतला. या जोरदार गदारोळानंतर सभापतींनी द्रमुकच्या आमदारांना सभागृहाबाहेर काढण्याचे आदेश दिले. त्यानंतर मार्शलने द्रमुकच्या आमदारांना उचलून बाहेर नेले. ‘इंडिया टूडे‘ने याबाबत वृत्त दिले.
सोमवारी विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री विजय यांनी नगरविकास व पाणीपुरवठा विभागांतर्गत होणाऱ्या कामांमध्ये कंत्राटदारांकडून 7.5 ते 10 टक्के रक्कम पक्षनिधी म्हणून वसूल केली जात असल्याचा गंभीर आरोप ईडीच्या कागदपत्रांच्या आधारे केला होता. याशिवाय त्यांनी प्रसिद्ध वीरानम पाणी योजनेबाबतच्या सरकारिया आयोगाच्या अहवालाचाही उल्लेख केला होता.
मंगळवारी कामकाज सुरू होताच द्रमुकचे प्रतोद ई. व्ही. वेलू यांनी मुख्यमंत्री विजय यांनी आदल्या दिवशी केलेल्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला. विजय यांनी पक्षनिधीच्या स्रोतांवर केलेले आरोप आणि सरकारिया आयोगाचे दिलेले संदर्भ हे विधानसभा नियमांच्या विरोधात असून ते कामकाज नोंदींमधून काढून टाकावेत अशी जोरदार मागणी वेलू यांनी केली.
दरम्यान, राज्य कायदेमंत्री आर. निर्मल कुमार यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा बचाव केला. विजय यांनी दिलेले संदर्भ हे सार्वजनिक क्षेत्रात उपलब्ध असलेले सरकारिया आयोगाचे अहवाल आणि ईडीच्या अधिकृत कागदपत्रांवर आधारित आहेत, असे सांगत त्यांनी तत्कालीन द्रमुक सरकारच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा पुनरुच्चार केला. यावरून द्रमुकचे सदस्य अधिकच आक्रमक झाले आणि त्यांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी सुरू केली.
VIDEO | Tamil Nadu Assembly: Speaker JCD Prabhakar asks Marshals to remove DMK members, says people of Tamil Nadu watching everything.
Tamil Nadu Chief Minister C Joseph Vijay’s addressed in the Legislative Assembly on Monday, in which he targeted the opposition DMK over past… pic.twitter.com/6Nagtybg6e
— Press Trust of India (@PTI_News) September 8, 2026
सभापती जे. सी. डी. प्रभाकर यांनी मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य नोंदींमधून काढून टाकण्यास स्पष्ट नकार दिला. सभापतींच्या या निर्णयानंतरही द्रमुकच्या आमदारांनी आपले आंदोलन मागे घेतले नाही. आमदार सभापतींच्या पीठासन अध्यक्षांसमोर जमा झाले आणि घोषणाबाजी करू लागले. सभापतींनी त्यांना एका मिनिटात आपापल्या जागेवर जाण्याचे आवाहन केले आणि वेलू किंवा के. एन. नेहरू यांना बोलण्याची संधी देण्याचे आश्वासन दिले. परंतु, आमदारांनी आंदोलन सुरूच ठेवले. सभागृहाचे नेते के. ए. सेनगोट्टायन यांनी सभापतींच्या निर्णयानंतरही अडथळा आणणाऱ्या आमदारांवर कारवाई करण्याची विनंती केली. आमदार परवानगीशिवाय पोस्टर्स घेऊन सभागृहात आल्याचे पाहून सभापतींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. गदारोळ थांबत नसल्याचे पाहून अखेर सभापतींनी मार्शलना बोलावून आंदोलन करणाऱ्या द्रमुक आमदारांना सभागृहातून बळजबरीने बाहेर काढण्याचे आदेश दिले. मार्शल आमदारांना बाहेर घेऊन जात असतानाही द्रमुकच्या आमदारांची घोषणाबाजी सुरूच होती.
























































