
गेल्या दहा वर्षांपासून महाराष्ट्रावर देवेंद्र फडणवीसांचे एकछत्री राज्य आहे, तरीही विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारी पेपरफुटीसारखी प्रकरणे राज्यात घडत आहेत. पात्र विद्यार्थ्यांना डावलून उमेदवारांचे भवितव्य फोडण्याचे व त्यांचे करीअर उद्ध्वस्त करण्याचे पाप सरकारने केले. ‘फूट’ व ‘फोडाफोडी’तून जन्माला आलेले लोक सरकारमध्ये बसले असताना तिथे फुटीशिवाय दुसरे काय घडणार? पेपरफुटीविरुद्ध उसळलेल्या संतापातून राज्यातील अनेक शहरांत विद्यार्थ्यांचे आक्रोश मोर्चे धडकत आहेत. ‘फुटक्या’ सरकारविरुद्ध असलेल्या रोषातून तरुण विद्यार्थ्यांचा लाव्हा रस्त्यावर उसळत आहे. या आगीचे वणव्यात रूपांतर झाले तर ‘फुटके’ सरकार त्यात भस्मसात होईल. पेपरफुटीतील सगळे दरोडेखोर तुरुंगात टाका. आगीशी खेळू नका!
राज्य लोकसेवा आयोगाच्या पेपरफुटीवरून महाराष्ट्रात सर्वत्र जनक्षोभ उसळला आहे. पुणे, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावतीमध्ये लोकसेवा आयोगाचे हजारो परीक्षार्थी व विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. ‘एमपीएससी’चे भ्रष्ट अध्यक्ष हटवा, पेपरफुटी थांबवा, पेपरफुटीची सखोल व निष्पक्ष चौकशी करा, स्पर्धा परीक्षा पारदर्शक पद्धतीने घ्या या मागण्यांसाठी संतप्त मोर्चे काढून महाराष्ट्रातील तरुण विद्यार्थी सरकारला जो घाम फोडत आहेत तो योग्यच आहे. लोकसेवा आयोगाचे पेपर लाखो रुपयांना विकले जात असतील तर स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून शासकीय सेवेत करीअर करण्याचे ध्येय उराशी बागळणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा तो चुराडा आहे. पात्र विद्यार्थ्यांना डावलून त्यांचा हक्क हिरावून घेणारे दरोडेखोर जर सरकार व लोकसेवा आयोगाच्या कचेरीत बसले असतील तर त्यांना खेचून बाहेर काढायलाच हवे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या मर्जीतील संस्थानिक आयोगावर बसवले व तीच चांडाळ चौकडी प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळत आहे. सरकारमध्ये असलेली ‘खोके संस्कृती’ आयोगातही आली आहे काय? लाखो रुपयांना पेपर विकून शासकीय अधिकारी पदांचा लिलावच सुरू झाला असेल तर विद्यार्थी तो कसा सहन करतील? महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पद भरतीमधील पेपरफुटीचे जे प्रकरण उघडकीस आले ते लांच्छनास्पद आहे. स्पर्धा परीक्षेचे पेपर विकणारे व विकत घेणारे कोण आहेत, सरकारमधील कोणाशी संबंधित आहेत हे आता लपून राहिलेले नाही. मात्र फुटकळ लोकांवर कारवाई करून पेपरफुटीच्या टोळीतील म्होरके, सूत्रधार व पाठीराखे
सरकारकृपेने मोकळेच
असल्याने विद्यार्थ्यांमध्ये रोष पसरला आहे. स्पर्धा परीक्षांची मेहनतीने तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात सरकारविरुद्ध लाव्हा उसळत आहे व त्यामुळेच राज्यभरात विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चातून पेपरफुटीविरुद्ध संतप्त पडसाद उमटत आहेत. विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चांनी महाराष्ट्र दणाणून गेला आहे व सरकारच्या कानाला मात्र दडे बसले आहेत. विद्यार्थ्यांचे आंदोलन तापले आहे आणि सरकार अजगराप्रमाणे लोळागोळा होऊन थंडगार पडले आहे. तरुणाईचा संताप पाहून सरकार गोंधळलेले दिसते. अन्यथा राज्यभरात संतप्त विद्यार्थ्यांचे पेपरफुटीविरुद्ध आक्रोश मोर्चे निघत असताना मोर्चाला सामोरे जाण्याचे सौजन्य सरकारने दाखवले असते. महाराष्ट्रात शिवशाहीचे सरकार असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कुठल्याही मोर्चांना मंत्र्यांनी सामोरे जावे अशी सक्त ताकीदच दिली होती. सरकार लोकांसाठी आहे, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आहे. त्यामुळे मोर्चे घेऊन येणाऱ्या लोकांचे म्हणणे मंत्र्यांनी ऐकून घेतलेच पाहिजे, असा दंडक शिवसेनाप्रमुखांनी घालून दिला होता. मात्र हल्ली वातानुकूलित दालनात बसणारे मंत्री फक्त ठेकेदारांनाच भेटतात व टक्केवारीवर चर्चा करतात. जनतेशी व जनतेच्या प्रश्नांशी त्यांना काही देणे-घेणे राहिलेले नाही. पेपरफुटीसंदर्भात विद्यार्थ्यांचे म्हणणे काय आहे, अभ्यास सोडून रस्त्यावर उतरण्याची वेळ विद्यार्थ्यांवर का आली, विद्यार्थ्यांच्या मागण्या काय आहेत, पेपरफुटीचे वारंवार घडणारे प्रकार रोखण्यासाठी काय करायला हवे हे सरकार नाही तर कोण समजून घेणार? पण ते समजून घेण्यात या सरकारचा नाइलाज आहे. जे सरकार स्वतःच वरून खालपर्यंत
‘फुटी’ने बरबटलेले
आहे, ते पेपरफुटीसारख्या गंभीर विषयात काय लक्ष घालणार? विद्यार्थ्यांच्या या आंदोलनात अनेक कल्पक आणि उपरोधिक पोस्टर्स झळकत आहेत. ‘‘तुम्हाला फक्त आमदार फोडायला बसवलंय का?’’ असा जहरी सवाल करणारी पोस्टर्स पुण्यातील आंदोलक विद्यार्थ्यांनी फडकवली. विद्यार्थ्यांच्या मनातील ही चीड आहे. लोकसेवा आयोगात बसलेले लोक पेपर फोडतात आणि सरकारमध्ये बसलेले लोक पक्ष फोडतात. आमदार-खासदार, नगरसेवक फोडतात. दोघांचाही धंदा एकच. ‘आयोग एक नंबरी, तर सरकार दस नंबरी’ असा हा प्रकार आहे. पेपरफुटीच्या प्रकरणात लक्ष घालण्याचे नैतिक अधिष्ठानच या सरकारकडे उरलेले नाही. त्यामुळेच मोर्चेकरी विद्यार्थ्यांना भेटून पेपरफुटीमुळे अभ्यासू व प्रामाणिक विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय समजून घेण्याचे धारिष्ट्य हे सरकार दाखवत नसावे. गेल्या दहा वर्षांपासून महाराष्ट्रावर देवेंद्र फडणवीसांचे एकछत्री राज्य आहे, तरीही विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारी पेपरफुटीसारखी प्रकरणे राज्यात घडत आहेत. पात्र विद्यार्थ्यांना डावलून उमेदवारांचे भवितव्य फोडण्याचे व त्यांचे करीअर उद्ध्वस्त करण्याचे पाप सरकारने केले. ‘फूट’ व ‘फोडाफोडी’तून जन्माला आलेले लोक सरकारमध्ये बसले असताना तिथे फुटीशिवाय दुसरे काय घडणार? पेपरफुटीविरुद्ध उसळलेल्या संतापातून राज्यातील अनेक शहरांत विद्यार्थ्यांचे आक्रोश मोर्चे धडकत आहेत. ‘फुटक्या’ सरकारविरुद्ध असलेल्या रोषातून तरुण विद्यार्थ्यांचा लाव्हा रस्त्यावर उसळत आहे. या आगीचे वणव्यात रूपांतर झाले तर ‘फुटके’ सरकार त्यात भस्मसात होईल. पेपरफुटीतील सगळे दरोडेखोर तुरुंगात टाका. आगीशी खेळू नका!






























































