
तब्बल महिना–दीड महिन्यापासून पाऊस गायब आहे. ऐन पावसाळयातच निम्म्याहून अधिक महाराष्ट्र दुष्काळाच्या संकटात सापडला आहे. त्यातच अखेरच्या सप्टेंबर महिन्यातही पावसाचे प्रमाण अत्यल्प राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तो खरा ठरला तर येत्या दोन महिन्यांत 90 टक्के महाराष्ट्राला दुष्काळाचा जबर तडाखा बसेल. एल निनोमुळे महाराष्ट्रच नव्हे, तर देशभरातील साडेतीनशे जिह्यांमध्ये अवर्षण व गंभीर दुष्काळी स्थिती ओढवली आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच अन्नधान्यांच्याही अभूतपूर्व टंचाईला तोंड द्यावे लागेल, असे चित्र महाराष्ट्रासह देशभरात दिसते आहे. केंद्र व राज्यातील डबल इंजिन सरकारला दुष्काळाच्या या भीषण संकटाची काही फिकीर आहे काय?
निसर्ग पुन्हा एकदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे. तब्बल महिनाभरापासून पाऊस गायब असल्यामुळे मराठवाडा, विदर्भासह राज्याच्या बहुतांश भागांवर दुष्काळाचे सावट घोंगावत आहे. राज्यातील 36 पैकी 31 जिह्यांमध्ये पावसाने दडी मारल्यामुळे शेतांमध्ये उभ्या असलेल्या पिकांची अवस्था बिकट झाली आहे. शेतशिवारे करपू लागली आहेत. काही जिह्यांत महिनाभरापासून पाऊस गायब आहे, तर काही जिह्यांमध्ये तब्बल दीड महिन्यांपासून पावसाने दडी मारली आहे. एखाद दुसरी सर वगळता पावसाने 30 ते 45 दिवसांची प्रदीर्घ विश्रांती घेतल्याने राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. ‘एल निनो इफेक्ट’मुळे यंदा पर्जन्यमान तुलनेने कमीच राहील, असा इशारा हवामान खात्याने पावसाळ्यापूर्वीच दिला होता. थोडीफार तूट होऊ शकते. मात्र एल निनोचा इतका भयंकर परिणाम महाराष्ट्रातील पर्जन्यमानावर होईल, याचा अंदाज हवामान खात्यालाही कदाचित आला नसावा. महाराष्ट्रातील 18 जिह्यांनी तर यंदा पावसाळा असा अनुभवलाच नाही. एकतर या वर्षी आधीच सुमारे 15 दिवस मान्सूनचे आगमन उशिराने झाले. जून महिना अत्यल्प पावसाचा गेल्यानंतर जुलै महिन्यात मात्र पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे खोळंबून राहिलेल्या पेरण्या तब्बल महिनाभर उशिराने झाल्या. मुंबई, पुणे, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे व नाशिक परिसरात जुलै महिन्यात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. मात्र ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापासून राज्यभर
पावसाने जी दडी
मारली, ती आजतागायत कायम आहे. जुलै महिन्यातील पावसामुळे पिके चांगली तरारून वर आली होती. शेतशिवारे हिरवीगार झाली. मात्र सोयाबीनला शेंगा, कापसाला बोंडे, मक्याला कणसे धरण्याची वेळ आली असतानाच ऐन फुलोऱ्याच्या वेळी पाऊस गायब झाला. सोन्यासारखी पिके शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत वाळू लागली. ज्या शेतकऱ्यांकडे विहिरी किंवा पाण्याचे स्रोत आहेत, त्यांनी जुलै महिन्यातील पावसात जमा झालेल्या पाण्यावर शिवारे भिजवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पाणीसाठाही संपल्याने आता पिके जगवायची कशी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला. सिंचनाची कुठलीच व्यवस्था नसल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांची तर अक्षरशः दैना झाली आहे. मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील काही जिह्यांत सोयाबीन, कापूस, मका, तूर, हळद ही पिके करपून गेली. उडीद, मूगही हातचे गेले. लाखो हेक्टरवरील पिकांनी माना टाकल्या. एरवी श्रावण महिन्यात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असतात. मात्र गेल्या कित्येक दशकांतील हा असा पहिलाच श्रावण महिना आहे, ज्यात थेंबभरही पाऊस पडला नाही. महिनाभरापूर्वी हिरवीगार दिसणारी शेते आता पावसाअभावी पिवळी पडली आहेत. सर्वच पिकांची वाढ खुंटल्याने शेतकऱ्यांचा पैसा तर वाया गेलाच, पण शेती फुलवण्यासाठी घेतलेले काबाडकष्टही मातीमोल ठरले. नाशिकच्या पावसामुळे मराठवाड्यातील जायकवाडी धरण भरले, एवढीच काय ती समाधानाची बाब. बाकी मांजरा धरणासह संपूर्ण मराठवाड्यातील लहान-मोठ्या धरणांत अत्यल्प पाणीसाठा आहे. विदर्भातही अनेक लघू व मध्यम प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. म्हणजे
नापिकीबरोबरच
पिण्याच्या पाण्याचेही गंभीर संकट दारात उभे आहे. दुष्काळाचा हा दुहेरी धोका ओळखून उपलब्ध पाण्याचे नियोजन व दुष्काळपूर्व उपाययोजना करण्यासाठी सरकारने आतापासूनच कामाला लागायला हवे. मात्र सारे काही आलबेल आहे, अशा थाटात राज्यकर्ते वावरत आहेत. विदर्भात यंदा 50 लाख हेक्टर, तर मराठवाड्यात 48 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर पेरण्या झाल्या. मात्र पावसाअभावी पिके करपल्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना उभ्या पिकांवर नांगर फिरवावा लागला. खरिपाचे पीक जमिनीत गाडून रब्बीच्या पिकांची तयारी करावी, असे शेतकऱ्यांना वाटले, पण सप्टेंबरचा पहिला आठवडा संपत आला तरी पावसाची चिन्हे दिसत नसल्याने गहू व हरभऱयासह रब्बी पिकांची पेरणी तरी होऊ शकेल की नाही, या चिंतेने आता शेतकऱ्यांना ग्रासले आहे. ऐन पावसाळ्यातच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. जमिनी अशाच कोरड्याठाक राहिल्या तर जनावरांच्या चाऱ्यासाठी आवश्यक असलेला मका, ज्वारीचा चारा आणायचा कुठून व पुढचे सात-आठ महिने पशुधन जगवायचे कसे? याची विवंचना शेतकऱ्यांना लागली आहे. तब्बल महिना-दीड महिन्यापासून पाऊस गायब आहे. ऐन पावसाळय़ातच निम्म्याहून अधिक महाराष्ट्र दुष्काळाच्या संकटात सापडला आहे. त्यातच अखेरच्या सप्टेंबर महिन्यातही पावसाचे प्रमाण अत्यल्प राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तो खरा ठरला तर येत्या दोन महिन्यांत 90 टक्के महाराष्ट्राला दुष्काळाचा जबर तडाखा बसेल. एल निनोमुळे महाराष्ट्रच नव्हे, तर देशभरातील साडेतीनशे जिह्यांमध्ये अवर्षण व गंभीर दुष्काळी स्थिती ओढवली आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच अन्नधान्यांच्याही अभूतपूर्व टंचाईला तोंड द्यावे लागेल, असे चित्र महाराष्ट्रासह देशभरात दिसते आहे. केंद्र व राज्यातील डबल इंजिन सरकारला दुष्काळाच्या या भीषण संकटाची काही फिकीर आहे काय?































































