सीजेपीच्या महिला कार्यकर्त्याच्या वडिलांना मारहाण करणारा स्वतंत्र भारद्वाज अखेर जेरबंद, बुलंदशहर येथून दिल्ली पोलिसांनी केली अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॉक्रोच जनता पार्टीच्या (सीजेपी) महिला कार्यकर्त्याच्या वडिलांना मारहाण करणाऱ्या स्वतंत्र भारद्वाज याला दिल्ली पोलिसांनी आज उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथून अटक केली. भारद्वाज याच्या अटकेच्या मागणीसाठी सीजेपीने आज दिल्लीतील संसद मार्ग पोलीस ठाण्यात तीन तास निदर्शने केली. त्यानंतर पोलिसांनी तपास करून भारद्वाज याला अटक केली.

नीशू आझाद या महिला कार्यकर्तीचे वडील संजय यांना भारद्वाज याने 23 जून रोजी जंतरमंतर येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान मारहाण केल्याचा आरोप होता. याचदरम्यान भारद्वाजचा एक पॉडकास्ट व्हिडीओ व्हायरल झाला. त्यात तो संजय यांच्यावर हल्ला केल्याची कबुली देतो. मात्र, आपण हा हल्ला आत्मसंरक्षणासाठी केल्याचा दावाही त्याने केला. आरोपी स्वतः हल्ला केल्याची गोष्ट कबूल करत असेल तर पोलीस कारवाई का करत नाहीत, असा सवाल सीजेपीचे प्रवत्ते सौरभ दास यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर भारद्वाजवर कारवाई करण्याची मागणी सीजेपीकडून लावून धरण्यात आली. आज अखेर त्याला अटक करण्यात आली.

पोलीस ठाण्याबाहेर सीजेपी कार्यकर्त्यांचे आंदोलन

स्वतंत्र भारद्वाज याच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सीजेपीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली.  पोलीस ठाण्यात सीजेपीच्या प्रतिनिधींसोबत पोलीस अधिकाऱ्यांची सुमारे तीन तास चर्चा झाली. त्यावेळी पोलिसांनी सीजेपीच्या प्रतिनिधींना कारवाईचे आश्वासन दिले. सीजेपीचे प्रतिनिधी, नगीनाचे खासदार चंद्रशेखर आझाद तसेच काँग्रेसच्या विधी पथकाने संसद मार्ग पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करत आरोपीवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि इतर कठोर कलमांन्वये कारवाई करण्याची मागणी केली होती.

भारद्वाज म्हणतो, माझे कोणीच काही करू शकत नाही

पोलिसांकडून अटक होण्यापूर्वी स्वतंत्र भारद्वाज याने काही वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींसमोर वादग्रस्त वक्तव्य केले. त्याने दावा केला की, ट्रम्प असो किंवा नेतन्याहूंनी यावे किंवा राहुल गांधी यांच्यासह संपूर्ण विरोधी पक्ष एकत्रपणे रस्त्यावर उतरले तरीही माझे काहीही वाकडे करू शकत नाहीत, असे भारद्वाज म्हणाला. या व्हिडीओमध्ये भारद्वाजने, “मी निशूच्या वडिलांचे डोके फोडले. 307 सारख्या गंभीर कलमानंतरही मला पोलिसांनी अटक केली नाही,’’ असे खळबळजनक वक्तव्य केले होते. हा व्हिडीओ काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांमधील अनेक नेत्यांनी शेअर केला होता.