
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या संदर्भात सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. निमित्त ठरले ते पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टचे. मित्र असा उल्लेख करत मोदी यांनी मेलोनी यांना सर्वाधिक काळ इटलीच्या पंतप्रधानपदी राहिल्यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
मेलोनी यांनी पंतप्रधान म्हणून आज 4 सप्टेंबर रोजी 1,413 दिवस पूर्ण केले. त्या 22 ऑक्टोबर 2022 रोजी इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या होत्या. दुसऱ्या महायुद्धानंतर त्या सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिल्या आहेत. इटलीचे माजी पंतप्रधान सिल्हिओ बर्ल्युस्कोनी हे 2001 ते 2005 या काळात 1,412 दिवस सत्तेवर होते. हा विक्रम मेलोनी यांनी मोडला. दुसऱया महायुद्धानंतर इटली 1946 मध्ये गणराज्य म्हणून स्थापन झाले. त्यानंतर बराच काळ इटलीत राजकीय अस्थिरता होती.
सोशल मीडिया पोस्टमध्ये काय म्हणाले मोदी…
दुसऱया महायुद्धानंतर सर्वाधिक काळ सलग इटलीच्या पंतप्रधानपदी राहिल्यानिमित्त माझी मैत्रीण पंतप्रधान मेलोनी यांना शुभेच्छा. त्यांच्या नेतृत्त्वावर इटलीच्या नागरिकांचा विश्वास ठाम असल्याचे हा माईलस्टोन दर्शवितो. हिंदुस्थान आणि इटली यांच्यातील विशेष रणनैतिक भागीदारी आणखी बळकट होण्यासाठी आमच्या मैत्रीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दोन्ही देशांच्या नागरिकांचे समृद्ध भविष्य घडवण्यासाठी आम्ही पुढेही सहकार्य सुरू ठेवण्यास उत्सुक आहोत, असे पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.




























































