
दिल्ली आणि एनसीआर परिसरात शुक्रवारी दुपारनंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या जोरदार पावसामुळे दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून, प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. विमानतळाच्या बाहेरील आणि प्रवेशद्वारातून आत येताना काही भागांमध्ये गुडघाभर पाणी साचल्याने प्रवाशांना सामानाच्या ट्रॉली ढकलत पाण्यातून वाट काढावी लागली.
पाणी साचल्यामुळे विमानतळाचा अरायव्हलचा काही भाग थोड्या वेळासाठी बंदही ठेवावा लागला होता. हवामान खराब असल्यामुळे दुपारी ३.३० ते ४.३० या वेळेत दिल्लीत येणारी तब्बल नऊ उड्डाणे इतर शहरांकडे वळवण्यात आली. यामध्ये चार जयपूरला, चार लखनौला आणि एक विमान अहमदाबादकडे वळवण्यात आले. एअर इंडियानेही खराब हवामानामुळे उड्डाणांवर परिणाम होऊ शकतो, अशी सूचना प्रवाशांना दिली आहे.
हवामान विभागाने दिल्लीसाठी अतिवृष्टी, मेघगर्जना आणि ताशी ४० ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा रेड अलर्ट जारी केला आहे. तर नोएडा आणि गाझियाबादमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. शुक्रवारी सकाळपासूनच आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली होती, त्यानंतर दुपारच्या सुमारास पावसाने जोर धरला. जन्माष्टमीच्या सणासाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांची या अचानक आलेल्या पावसामुळे मोठी तारांबळ उडाली. केवळ विमानतळच नाही तर, दिल्ली आणि गुरुग्राममधील अनेक सखल भागात आणि मुख्य रस्त्यांवर पाणी साचल्याचे चित्र आहे.



























































