Breaking News – ड्रग टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळलेल्या एअर इंडियाच्या पायलटवर कारवाई; कंपनीने सेवेतून काढले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फुकेट-दिल्ली विमानाच्या मुख्य वैमानिकावर एअर इंडियाने कठोर कारवाई केली आहे. सायकोअॅक्टिव्ह पदार्थांच्या चाचणीत पायलट पॉझिटिव्ह आढळल्यानंतर कंपनीने पायलटला तात्काळ सेवेतून बडतर्फ केले. एअर इंडियाच्या फुकेत-दिल्ली मार्गावरील A12379 या विमानाच्या उड्डाणादरम्यान ओडिशाच्या हवाई हद्दीत विमानाची उंची अचानक सुमारे 300 फूटांनी कमी झाली होती. या घटनेत काही प्रवाशांना दुखापत झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर वैमानिकाची सायकोअॅक्टिव्ह पदार्थांची चाचणी करण्यात आली.

फुकेट-दिल्ली एअर इंडियाच्या विमानातील धक्कादायक प्रकार; मुख्य वैमानिक ड्रग्ज चाचणीत पॉझिटिव्ह

या चाचणीत मुख्य वैमानिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर एअर इंडियाने त्याच्यावर तातडीने कारवाई केली. एअर इंडियाने या कारवाईबाबत निवेदन जारी केले आहे. सुरक्षा नियम, वैमानिकांची योग्यता आणि नियामक आवश्यकतांच्या उल्लंघनाबाबत कंपनीचे ‘झिरो टॉलरन्स’ धोरण असल्याचे एअर इंडियाने स्पष्ट केले. असे वृत्त एबीपीने दिले आहे.

एअर इंडियाच्या सुरक्षा, योग्यता आणि नियामक आवश्यकतांबाबतच्या धोरणानुसार संबंधित वैमानिकाला तात्काळ सेवेतून काढून टाकण्यात आले आहे. विमानाच्या उड्डाणादरम्यान झालेली उंचीतील अचानक घट आणि त्यानंतर समोर आलेला ड्रग टेस्टचा अहवाल यामुळे या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे.