
पश्चिम द्रुतगती मार्गावरील गोरेगाव मेट्रो स्टेशनखाली खासगी बसला शुक्रवारी सायंकाळी 6.15 च्या सुमारास भीषण आग लागली. आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली. आगीचे लोळ आणि धुराचे लोट मेट्रो स्थानकात घुसल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे मेट्रो स्थानकात एकच गोंधळ उडाला. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी रवाना झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.
एबीपीने दिलेल्या वृत्तानुसार, मेट्रो मार्गिका 7 वरील ओबेरॉय गार्डन सिटी स्टेशनखाली खासगी बसला आग लागली. बसला आग कशामुळे लागली याबाबत अद्याप समजू शकले नाही. धुराचे लोट वरच्या मेट्रो स्थानकात पसरल्याने प्रवाशांना श्वास घ्यायला त्रास झाला. सुरक्षेचा उपाय म्हणून धूर कमी होईपर्यंत दोन मेट्रो स्थानकावरील थांबा दिला जाणार नसल्याचे मेट्रोने प्रशासनाने सांगितले. या घटनेमुळे पश्चिम द्रुतगती मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली.





























































