
महेंद्रसिंग धोनी गेल्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून एकही सामना खेळला नाही. धोनी दुखापतीमुळे संपूर्ण हंगामात बेंचवरच होता. हंगाम सुरू होण्यापूर्वीच त्याला गुडघ्याचा त्रास सुरू झाला होता. पुढची आयपीएल सुरू होण्यास सहा महिने शिल्लक असताना धोनाबाबत एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे. धोनी आपल्या अटींवरच खेळणार असल्याचे आता समोर आले आहे. कारण इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळण्यासाठी त्याने नकार दिला आहे. चेन्नईचा माजी फलंदाज एस. बद्रीनाथने धोनीच्या खेळण्याबाबत महत्वाचे वक्तव्य केले आहे.
धोनीबद्दल बद्रीनाथचा दावा
बद्रीनाथने दावा केला आहे की, महेंद्रसिंग धोनी आयपीएलमध्ये ‘इम्पॅक्ट प्लेअर’ म्हणून खेळणार नाही. धोनीने स्वतः मला हे सांगितले आहे. तो स्वतःला पूर्णवेळ यष्टिरक्षक मानतो. म्हणजेच त्याला संपूर्ण 20 षटके मैदानावर खेळायचे आहे. त्यामुळे, तो इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळणार नाही.’
बद्रीनाथने मान्य केले की, ‘जर धोनी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळला तर ते सीएसकेसाठी फायदेशीर ठरेल. मला वाटते की जर त्याने असे केले तर चेन्नईला रणनीतिकदृष्टय़ा फायदा होईल. फ्लेमिंगने सांगितल्याप्रमाणे त्याचे शरीर जास्त वेळ खेळण्याचा दबाव सहन करू शकत नाही. तो फक्त 16 व्या षटकानंतर फलंदाजी आणि यष्टिरक्षण करू शकतो. जेव्हा त्याचा सहभाग इतका मर्यादित असतो, तेव्हा तो इम्पॅक्ट प्लेअर म्हणून सर्वोत्तम ठरेल.’




























































