
देशातील बहुतेक सर्व क्षेत्रांत भ्रष्टाचाराचा बोलबाला असल्याचे केंद्रीय दक्षता आयोगाच्या 2025 च्या वार्षिक अहवालातून समोर आले आहे. या अहवालानुसार 2025 मध्ये विविध सरकारी मंत्रालये व आस्थापनांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या 70,500 हून अधिक तक्रारी आल्या असून सर्वाधिक तक्रारी बँका आणि रेल्वेच्या विरोधात आहेत.
भ्रष्टाचाराच्या एकूण 70,584 तक्रारींपैकी तब्बल 9,933 तक्रारी बँकांच्या विरोधात आहेत. त्या खालोखाल रेल्वेचा क्रमांक आहे. रेल्वेच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या 9,381 तक्रारी आल्या आहेत. गृहनिर्माण आणि नगरविकास विभागाशी संबंधित विभागांच्या विरोधात 6,531 तर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विरोधात 4,834 तक्रारी आल्या आहेत. कोळसा क्षेत्र, पेट्रोलियम मंत्रालय, रस्ते आणि महामार्ग, गृह मंत्रालय, मनुष्यबळ विकास मंत्रालय, कामगार मंत्रालय, विमा कंपन्या आणि दूरसंचार क्षेत्राच्या विरोधातही हजारो तक्रारी आहेत.


























































