
राज्यात मराठा समाज्याच्या 58 लाख नोंदी सापडल्या आहेत. 5 सप्टेंबरपर्यंत ग्रामपंचायतींमध्ये या नोंदींची यादी लावण्यात येईल. नाते, रक्ताचे नाते आणि कुळाच्या आधारे ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल, असे आश्वासन सरकारच्या शिष्टमंडळाकडून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना आज देण्यात आले. त्यानंतरही जरांगे हे उपोषणावर ठाम आहेत.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आरपारच्या लढाईची घोषणा करत मनोज जरांगे यांनी शनिवारपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. सरकारकडून कितीही दबाव आला तरी आता मागे हटणार नाही, असा निर्धार व्यक्त करत जरांगे यांनी 12 सप्टेंबरपासून मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. जरांगे यांनी उपोषण सोडून आंदोलन मागे घ्यावे यासाठी गेल्या चार-पाच दिवसांपासून सरकारी पातळीवरून प्रयत्न सुरू आहेत. सरकारचे प्रतिनिधी म्हणून भाजप आमदार प्रसाद लाड यांनी बुधवारी रात्री जरांगे यांची भेट घेऊन मध्यस्थीचा प्रयत्न केला. यानंतर गुरुवारी रात्री मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, उदय सामंत, मकरंद पाटील यांच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे यांची उपोषणस्थळी भेट घेऊन मराठा समाजाच्या मागण्यांबाबत चर्चा केली.
- ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांनी उद्यापासून कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करावे. 5 सप्टेंबरपर्यंत ग्रामपंचायतींमध्ये नोंदीची यादी लावण्यात येणार आहे. कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी प्रत्येक जिह्यासाठी नोडल अधिकारी नेमण्यात येणार येईल. हैदराबाद गॅझेटनुसार तुम्ही अर्ज केले आणि अर्ज नाही घेतले तर जिल्हाधिकाऱयांकडे अर्ज करा. जात पडताळणीत अर्ज बाद झाल्यास सरकार विद्यार्थ्यांची फी भरेल, असे विखे-पाटील म्हणाले.
जरांगे उपोषणावर ठाम, काही झाले तरी आंदोलन थांबणार नाही
मराठा समाजाच्या सर्वच्या सर्व मागण्या मान्य करा. त्यासंदर्भात 10 तारखेपर्यंत जीआर काढून सर्व निर्णयांची अंमलबजावणी करा. सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाल्यास मुंबईत येऊन गुलाल उधळण्यात येईल. पण काही झाले तरी आता आंदोलन थांबणार नाही, अशी ठाम भूमिका घेत मनोज जरांगे यांनी उपोषण सोडण्यास आणि आंदोलन स्थगित करण्यास नकार दिला.



























































