हिंदुस्थानने हाँगकाँगला चिरडले, स्मृतीचे तुफानी शतक; दीप्ती शर्माच्या तीन विकेट्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानने आशिया कप क्रिकेट स्पर्धेत हाँगकाँगला चिरडले. हिंदुस्थानची सलामीवीर स्मृती मानधनाची तुफानी फटकेबाजी आशिया कप क्रिकेट स्पर्धेत पाहायला मिळाली. हाँगकाँगच्या गोलंदाजांना आपल्यासमोर नतमस्तक करत स्मृतीने झंझावाती शतक झळकावले. यावेळी वादळी फटकेबाजी करताना स्मृतीने टी-20 क्रिकेटमध्ये आपलाच रेकाॅर्ड मोडला. स्मृतीच्या झुंजार शतकाच्या जोरावर हिंदुस्थानला 20 षटकांत 5 बाद 195 असा धावांचा डोंगर उभारता आला. या आव्हानाचा पाठलाग करताना हाँगकाँगला फक्त 56 धावांत सर्व बाद करत हिंदुस्थानने 137 धावांनी दणदणीत विजय साकारला. या स्पर्धेतील हिंदुस्थानचा हा दुसरा विजय ठरला.

हाँगकाँगने नाणेफेक जिंकली आणि हिंदुस्थानला प्रथम फलंदाजीला पाचारण केले. या गोष्टीचा चांगलाच फायदा स्मृतीने उचलला. सुरुवातीपासून स्मृतीने गोलंदाजीची दाणादाण उडवायला सुरुवात केली. शेफाली वर्माला यावेळी 28 धावांवर बाद झाली. प्रतिका रावल (10) रिचा घोष (11) आणि हरमनप्रीत काैर (10) यांनाही स्मृतीला साथ देता आली नाही. पण स्मृती एकटीच हाँगकाँगच्या संघाला भारी पडली. स्मृतीने अर्धशतक झळकावले आणि तिने आपल्या फलंदाजीचा वेग वाढवला. स्मृती कधी शतकासमीप आली, हे समजलेदेखील नाही. धडाकेबाज फटकेबाजी करत स्मृतीने आपले दुसरे शतक झळकावले. यापूर्वी स्मृतीची 112 ही सर्वाधिक धावसंख्या होती. पण या सामन्यात स्मृतीने तिचाच रेकाॅर्ड मोडला.

दणकेबाज फटकेबाजी करत स्मृतीने फक्त 64 चेंडूंत 14 चौकार आणि सात षटकारांच्या जोरावर 124 धावांची दिमाखदार खेळी साकारली. स्मृतीने 18 व्या षटकात सलग तीन षटकार लगावत आपले इरादे स्पष्ट केले. स्मृतीच्या शतकाच्या जोरावर हिंदुस्थानला आपल्या विजयाचा पाया रचता आला.