
पावसामुळे बंद असलेली चार धाम हेलिकॉप्टर सेवा आता पुन्हा सुरू होणार आहे. येत्या 15 सप्टेंबर 2026 पासून ही सेवा सुरू करण्यात येणार आहेत. 17 सप्टेंबरपासून सेवा प्रत्यक्ष सुरू होतील, असे उत्तराखंड नागरी उड्डाण विकास प्राधिकरणाने (UCADA) जाहीर केले आहे. तत्पूर्वी, नागरी उड्डाण महासंचालनालय (DGCA) अंतिम सुरक्षा तपासणी करणार आहे.
फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 15 सप्टेंबरपर्यंत मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, हेलिकॉप्टरच्या उड्डाणांसाठी हवामान परिस्थिती तुलनेने अनुकूल आणि सुरक्षित राहण्याची अपेक्षा आहे. असे असले तरी, उंचावरील भागातील सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी मार्गाची सुरक्षा तपासणी केली जात आहे.
विमानांच्या उड्डाणांवर देखरेख आणि सुरक्षा उपाययोजना अधिक सक्षम करण्यासाठी सहस्रधारा हेलिड्रोम येथे एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) युनिट स्थापन करण्यात आले आहे. तसेच, सिरसीजवळील सीतापूर येथे विमानतळ प्राधिकरणाच्या (AAI) अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली एक तात्पुरते ATC युनिट कार्यरत असेल.


























































