
वैश्विक
अवकाशातून एखादा अशनी पडून विवर निर्माण होण्याचा अगदी जवळचा पुरावा म्हणजे सुमारे 52 हजार वर्षांपूर्वी लोणार येथे अशनी पडून निर्माण झालेले विवर-सरोवर. अशी इतर सर्व देशांतली मिळून जवळपास 190 निश्चितपणे सिद्ध झालेली अशनी आघात विवरे आहेत. त्यापैकी बहुतांश समुद्रांच्या तळाशी असून 190 ते 200 विवरांचे नामांकन झाले आहे. दक्षिण आफ्रिकेतले व्रेडेफोर्ट हे सुमारे 170 ते 300 किलोमीटर व्यासाचं विवर पृथ्वीवरचे सर्वात मोठे अशनी आघात विवर मानले जाते. सुमारे 2 अब्ज वर्षांपूर्वी हे विवर निर्माण झाले. त्यानंतर क्रमांक लागतो मेक्सिकोमधील चिक्स्लब या 180 किलोमीटर व्यासाच्या विवराचा. तिसऱ्या क्रमांकावर येते सायबेरियातील (रशिया) 100 किलोमीटर व्यासाचे पॉपिगाई विवर.
पृथ्वीपलीकडच्या म्हणजे आपल्या सौरमालेतील ग्रहांवरच्या एकत्रित विवरांचा विचार केला तर काही दशलक्ष आघात विवरांची संख्या भरेल. ‘इन्टरनॅशनल अॅस्ट्रॉनॉमिकल युनियन’ या संस्थेने आतापर्यंत अनेक ग्रह आणि नैसर्गिक उपग्रहांवरच्या 5 हजारपेक्षा जास्त आघात विवरांची नोंद केली आहे.
आपल्या पृथ्वीच्या एकचतुर्थांश पृष्ठभाग असलेल्या आपल्या चंद्रावर सुमारे 30 हजार विवरांची गणना झाली आहे. त्यापैकी 9 हजार विवरांची निश्चिती आंतरराष्ट्रीय खगोल संस्थेने केली आहे. याशिवाय पृथ्वीसारख्या कठीण पृष्ठभागाचे ग्रहगोल, उपग्रह असलेले बुध, शुक्र, मंगळ आणि काही ग्रहांच्या महाकाय उपग्रहांवरसुद्धा आपल्या चंद्राप्रमाणेच असंख्य विवरे आहेत.
सर्व ग्रहांभोवती फिरणारे उपग्रहसुद्धा अशनी-आघात बाधित आहेत. त्या सगळय़ांवरच्या आघात विवरांची गणना करणे तसे अशक्यच; परंतु तीसुद्धा लक्षावधी आहेत. सर्व ग्रह-उपग्रहांवरच्या अशनी आघातजन्य विवरांचं नामांकन इन्टरनॅशनल अॅस्ट्रॉनॉमिकल युनियन करीत असते.
आता जाऊया बहुचर्चित मंगळ ग्रहाकडे. भावी काळातील वसतीयोग्य जागा म्हणून माणूस मंगळाकडे पाहतो. अमेरिकेने इलॉन मस्कसारखे उद्योजक आणि जगातील इतरही अनेक देशही मंगळ हे माणसाचे भविष्यकालीन वसाहतीचे ठिकाण असेल असे मानतात. त्यासाठीच्या महत्त्वाकांक्षी मोहिमांची तयारी करतात. सूर्यापासून पृथ्वी 15 कोटी किलोमीटरवर, तर मंगळ 22 कोटी किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजे पृथ्वी-मंगळ अंतर सरासरी 7 कोटी किलोमीटर इतके होईल. हे दोन्ही ग्रह जवळ असतात तेव्हा सुमारे साडेपाच कोटी किलोमीटर अंतरावर येतात. तर लांब असताना त्याहून जास्त कि.मी.वर असतात. मंगळ-पृथ्वी अंतर तुलनेने ‘जवळ’ असताना मंगळ-मोहीम आखणे फायद्याचे असते. तरीसुद्धा हा प्रवास येऊन-जाऊन सुमारे 9 कोटी 40 किलोमीटर होईल आणि 30 ते 36 महिने या प्रवासाला लागतील. याचा अर्थ मंगळावरच्या ‘सहली’साठी किमान चार वर्षांची सुट्टी घ्यावी लागेल.
आता मंगळावरच्या ‘युटोपिया प्लॅनेशिया’ या 3,300 किलोमीटर इतका विराट व्यास असलेल्या सौरमालेतील सर्वात मोठय़ा आघात-विवराविषयी जाणून घेऊया. हे विवर मंगळ ग्रहाच्या उत्तर ध्रुवीय खोऱयाचा भाग आहे. हे खोरे 10 हजार 600 किलोमीटर पसरले असून या भागातील ‘युटोपिया’ विवरात व्हायपिंग-2 हे यान 3 सप्टेंबर 1976 रोजी उतरले.
या विशाल लाल विवरातील मातीचा भाग लाटांसारखा दिसतो. आपल्याकडे वाळवंटातल्या ‘सॅण्ड डय़ुन’चा जसा पॅटर्न तयार होतो, तसाच मंगळावरच्या या महाविवरातील पृष्ठभागाचा तयार झाला आहे. त्याला ‘स्पॅलप्ड’ म्हटले जाते. तो लहरी पिंवा तरंगासारखाही म्हणता येईल.
या ‘युटोपिया’ विवराच्या तळात खोलवर प्रचंड भूगर्भीय बर्फ सापडल्याचे ‘नासा’ने 22 नोव्हेंबर 1976 रोजी जाहीर केले. त्याचे पाणी झाले तर ते पृथ्वीवरच्या ‘लेक सुपिरियर’ या उत्तर-मध्य अमेरिकेतील सरोवराच्या पाण्याएवढे होईल असे म्हटले जाते. हे सरोवर अमेरिका-कॅनडाच्या सीमेवर आहे. त्याचा विस्तार 1 लाख 28 हजार चौरस किलोमीटर एवढा असून ते जास्तीत जास्त 1300 फूट खोल आहे. त्याची सरासरी खोली 480 फूट असून त्यामध्ये 12 हजार 100 क्युबिक किलोमीटर इतके पाणी सामावलेले आहे. लिटरमध्ये एकावर 12 शून्य म्हणजे 1 क्युबिक किलोमीटर गुणिले 12100.
हे गणित थोडक्यात एवढय़ासाठीच मांडले की, इतका पाणीसाठा जर मंगळावरच्या ‘युटोपिया’ विवराच्या तळाशी थिजलेल्या बर्फाच्या स्वरूपात दडलेला असेल तर सौरमालेतील हे सर्वात मोठे विवर, भविष्यकालीन मानवी पर्यटनासाठी ते पाणी विविध प्रकारे उपयुक्त ठरेल. त्यातून हायड्रोजन इंधनासाठी तर ऑक्सिजन जगण्यासाठी प्राप्त करता येईल.
अर्थात सध्या तरी ते ‘युटोपिया’ विवराबद्दलचे युटोपियन म्हणजे स्वप्नरंजनच आहे. मात्र अशी स्वप्ने काही वेळा संशोधनाला चालना देतात. त्यामध्ये मंगळावरच्या या विवराला महत्त्व आहे हे खरेच!





























































