
डॉ. प्रीतम भी. गेडाम
शिक्षणाला उन्नत बनविण्यात ग्रंथालयांचे मुख्य योगदान असते. कारण ग्रंथालये ज्ञानरूपी केंद्र म्हणून सतत प्रज्वलित राहतात. एकेकाळी आपल्या देशात नालंदा, तक्षशिला यांसारखी समृद्ध विद्यापीठे होती, जिथली ग्रंथालये त्यांच्या विशाल समृद्धी आणि भव्यतेसाठी जगप्रसिद्ध होती आणि जगभरातून विद्यार्थी येथे ज्ञानप्राप्तीसाठी येत असत. आजच्या आधुनिक युगात तंत्रज्ञानाचा वापर केल्याशिवाय कोणतेही क्षेत्र विकसित होऊ शकत नाही, सर्वांना उन्नत आणि सुविधाजनक कार्यप्रणालीची आवश्यकता आहे. सध्याचा जमाना ‘एआय’चा आहे. त्या तंत्रज्ञानाची ग्रंथालय विकासाला मोठी मदत होऊ शकते.
आज जगभरातील माहिती आणि वाचन साहित्य केवळ एका क्लिकवर उपलब्ध आहे. त्यामुळे पारंपरिक ग्रंथालयेही डिजिटल होत आहेत, परंतु आजही देशातील बहुतांश ग्रंथालये आपली दुरवस्थेची कहाणी सांगताना दिसतात. बहुतांश ग्रंथालयांमध्ये कौशल्यपूर्ण कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता आहे, योग्य आणि नवनवीन वाचन साहित्य नाही, योग्य देखभाल नाही, संसाधनांची कमतरता आहे, मूलभूत सुविधाही नाहीत, अनेक ग्रंथालयांच्या इमारती भग्नावस्थेत पोहोचल्या आहेत. निधीचा अभाव ही तर नेहमीचीच समस्या आहे. अशा ग्रंथालयांमध्ये असलेले मौल्यवान साहित्यसंग्रह मोठ्या प्रमाणात नष्ट होत आहेत. अशा परिस्थितीत ग्रंथालये आपल्या उद्दिष्टपूर्तीपासून दिवसेंदिवस दूर जात आहेत. अशा वेळी सर्वात मोठय़ा लोकसंख्येसाठी प्रगत डिजिटल ग्रंथालय हे केवळ एक स्वप्न बनून राहते. देशातील अनेक राज्य सरकारांकडून अनुदानित सार्वजनिक ग्रंथालयांतील कर्मचाऱयांच्या अत्यंत कमी वेतनाची समस्या अनेक दशकांपासून कायम आहे. महाराष्ट्र राज्य सरकारकडून अनुदानित बहुतांश शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांच्या ग्रंथालयांमध्ये कुशल कर्मचारीच नाहीत, अनेक दशकांपासून पदभरती झालेली नाही. अनेक वरिष्ठ महाविद्यालयांचीही हीच परिस्थिती आहे. आता जर देशात सर्वत्र अशी समस्या दिसणार असेल तर प्रगत ग्रंथालयांचे स्वप्न किती टक्के लोकसंख्येच्या वाटय़ाला वास्तवात येऊ शकेल?
केंद्र सरकारद्वारे संचालित शिक्षण संस्था, विद्यापीठे, महागडी खासगी संस्थाने ग्रंथालये विकसित करण्यावर भर देत आहेत. सध्या काही राज्ये आणि महानगरपालिकांनीही डिजिटल ग्रंथालयांच्या निर्मितीत सहभाग दिला आहे, परंतु हे अत्यंत कमी आहे. सर्वात मोठी लोकसंख्या म्हणजेच ग्रामीण, मागास भाग आणि आर्थिक मदतीअभावी असलेले क्षेत्र अत्यंत खराब स्थितीत आहे. नवीन शिक्षण प्रणाली 2020 नुसार, शाळांना विकसित आणि सुविधासंपन्न बनविण्यासाठी मूलभूत सुविधा, विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालय, संगणक कक्ष, सर्व विषयांचे तज्ञ शिक्षक आणि कौशल्यपूर्ण कर्मचारी प्रत्येक शाळेत आवश्यक मानले गेले आहेत. नीती आयोगाच्या अहवालानुसार, सन 2017-18 ते 2022-23 दरम्यान देशातील 92 हजार सरकारी शाळा बंद झाल्या. एक लाखाहून अधिक शाळा एका शिक्षकाच्या भरवशावर आहेत, तर 7993 शाळांमध्ये एकही विद्यार्थी नाही. प्राथमिक शाळेत प्रवेश घेणाऱ्या सुमारे 40 टक्के विद्यार्थ्यांना कधीच इयत्ता 12 वीपर्यंत पोहोचता येत नाही. अशा प्रकारे आपण देशभरात समान गुणवत्तेची राष्ट्रीय स्तरावरील शिक्षण व्यवस्थेचे योग्य व्यवस्थापन कसे प्रस्थापित करू शकू आणि जागतिक स्तरावरील शिक्षण धोरणाशी कशा प्रकारे समन्वय साधू शकू?
जगभरातील छोटे छोटे देश आपल्या प्रगत तंत्रज्ञानाच्या बळावर विकसित आहेत. प्रत्येक नवीन तंत्रज्ञान आपल्याला नवी कौशल्ये, विकासाची रणनीती, सकारात्मक-नकारात्मक परिणाम आणि प्रगतीचा मार्ग दाखवते. जर तंत्रज्ञानाचे कौशल्यपूर्ण योग्य व्यवस्थापन केले तर आपण जागतिक स्तरावरील सुविधासंपन्न केंद्रांची निर्मिती करू शकतो. आजच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्ताही आपल्याला हीच संधी देत आहे की, एआयचा वापर आपल्या कार्यक्षेत्राला अधिक चांगले कसे बनवता येईल, ज्यामुळे वाचकांना उत्तम सेवांचा लाभ त्वरित मिळेल. हा लाभ देशातील प्रत्येक ग्रंथालयातील प्रत्येक वाचकापर्यंत सहज पोहोचला पाहिजे. एआय तंत्रज्ञान ग्रंथालय सेवांना अधिक प्रभावी आणि वापरकर्ताकेंद्रित बनवत आहे. एआय हा ग्रंथालयाध्यक्षाचा पर्याय नसून त्याची कार्यकौशल्यता आणि कार्यक्षमता वाढविणारे एक शक्तिशाली सहाय्यक साधन आहे.
ग्रंथालयात एआय वाचकांच्या विषयानुसार योग्य वाचन साहित्याचा शोध, मार्गदर्शन आणि संशोधन विषयाचे विश्लेषण करून सूचना, संशोधनातील अंतर, साहित्य समीक्षा, प्रगत शोध प्रणाली, सूचीकरणात वेळेची बचत, मानवी चुका कमी करणे, जलद माहिती पुनर्प्राप्ती, संसाधनांचे अधिक चांगले संघटन, दुर्मिळ पुस्तकांचे दीर्घकालीन संरक्षण, बहुभाषिक माहिती सेवा, मागणीनुसार उत्पृष्ट वाचन साहित्य संग्रह विकास, मजबूत ग्रंथालय प्रशासन, साहित्यिक चोरीची ओळख, संस्थात्मक ज्ञान व्यवस्थापन, माहिती साक्षरतेला प्रोत्साहन यांसह ग्रंथालयातील प्रत्येक विभाग आणि कार्यात एआय मदतगार ठरत आहे. तसेच एआयचे नकारात्मक पैलूही न विसरता आपण सकारात्मक काम केले तर वेळ, पैसा, पुस्तकसंग्रह आणि ज्ञानाचा अचूक वापर होईल आणि प्रत्येक वाचकापर्यंत त्याचे उत्कृष्ट साहित्य योग्य वेळी पोहोचेल आणि हेच ग्रंथालयाचे उद्दिष्ट आहे.
एक अनुभव सांगत आहे. काही वेळापूर्वी माझ्या आलेखाचे एका वाचकाचा, महाराष्ट्र राज्यातील खान्देश क्षेत्रातील ग्रामीण भागातील एका वृद्ध व्यक्तीचा मला फोन आला. ते गावातील तरुणांसाठी अनेक वर्षांपासून एक छोटेसे ग्रंथालय चालवत आहेत. त्यांनी आपली परिस्थिती आणि ग्रंथालयाची वास्तविकता सांगत आपली समस्या माझ्यासमोर मांडली. त्यांनी सांगितले की, ते 83 वर्षीय पेन्शनधारक आहेत आणि पेन्शनच्या निधीवरच ग्रंथालय चालवतात. सरकारकडून किंवा लोकांकडूनही कोणतीही मदत मिळत नाही. पेन्शनही इतकी कमी आहे की, स्वतःचा उदरनिर्वाह मोठ्या अडचणीने करून ग्रंथालयासाठी काही वर्तमानपत्रेच खरेदी करू शकतात. पुस्तके खरेदी करण्यासाठी काही पैसे शिल्लक राहत नाहीत. गावातील लोकसंख्याही गरीब वर्गातील आहे. ग्रंथालयात अभ्यास करणारे विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे तरुणच अधिक येतात. आसपासच्या गावांमध्येही इतर कोणतेही ग्रंथालय नाही. पुढे त्यांनी सांगितले की, गावातील तरुणांची शेवटची आशा हेच ग्रंथालय आहे. या ग्रंथालयाला सरकारी अनुदान मिळावे यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले, परंतु त्यांना कोणतेही यश मिळाले नाही. बोलता बोलता भावुक होऊन ते रडू लागले आणि म्हणाले की, त्यांच्या निधनानंतर हे ग्रंथालय कायमचे बंद होईल, जे या स्थानिक तरुणांच्या अभ्यासाचा एकमेव आधार आहे.
आपल्या देशात, समाजात, आजूबाजूला अनेक दशकांपासून अशी असंख्य ज्ञानरूपी ग्रंथालये आहेत, जी नष्ट होण्याच्या उंबरठय़ावर पोहोचली आहेत. अनेक तर नष्टही झाली आहेत, परंतु आजही त्यांच्यापर्यंत योग्य मदत पोहोचू शकलेली नाही. प्रगत तंत्रज्ञान आणि मजबूत शिक्षण प्रणालीचा लाभ प्रत्येक स्तरातील, प्रत्येक वर्गातील व्यक्तीपर्यंत कोणत्याही अडथळ्याशिवाय पोहोचला पाहिजे तेव्हाच सर्वांगीण विकास होऊ शकेल. प्रत्येक ग्रंथालयाच्या विकासासाठी पुरेसा निधी, प्रगत संसाधने, उत्तम वाचन संग्रह, उत्पृष्ट देखभाल आणि उच्चशिक्षित कौशल्यपूर्ण कर्मचारी असले पाहिजेत, अन्यथा शिक्षणाचे ज्ञानस्रोत केंद्र अर्थात ग्रंथालयांच्या विकासातील एआय तंत्रज्ञानरूपी ज्ञानसेवा मर्यादित वाचक वर्गापुरतीच राहू नये, जी शैक्षणिक गुणवत्तेतील दरी वाढविण्याचे एक साधन ठरू शकते.






























































