मुंबईतील सर्व डॉक्टर, अभियंत्यांच्या पदव्यांची चौकशी होणार! बनावट प्रमाणपत्राच्या आधारे महापालिकेत नोकरी! अभियंत्याचे निलंबन; आमदार सुनील प्रभू यांच्या लक्षवेधीनंतर प्रशासनाला आली जाग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महापालिकेत कार्यरत अभियंत्याने बनावट डिप्लोमा आणि डिग्री प्रमाणपत्राच्या आधारे दुय्यम अभियंता (सब इंजिनीअर) पदावर बेकायदा नियुक्ती मिळवून सेवेचा लाभ घेतल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. या गंभीर प्रकरणानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले असून,  संबंधित अभियंत्याचे तातडीने निलंबित करण्यात आले आहे.

तसेच पालिकेत कार्यरत असणाऱ्या सर्व अभियंता आणि डॉक्टरांच्या शैक्षणिक प्रमाणपत्रांची फेरतपासणी करण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे. शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे अभियंत्याचा डिग्री घोटाळा उघडकीस आणला होता. पालिकेतील एका अभियंत्याने बनावट शैक्षणिक कागदपत्रे सादर करून नोकरी मिळवल्याचा आरोप त्यांनी केला होता. या लक्षवेधीनंतर प्रशासनाने संबंधित अभियंत्याची कागदपत्रे तपासली असता, त्याच्याकडे योग्य शैक्षणिक पात्रता नसल्याचे सिद्ध झाले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी 4 जून 2026 रोजी विशेष मंजुरी दिली आहे

त्यानुसार, नगर अभियंता कार्यालयाने आज, 31 ऑगस्ट रोजी परिपत्रक काढून सर्व विभागांना तातडीचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार पालिकेच्या सर्व विभाग कार्यालयांमध्ये कार्यरत असलेल्या सर्व अभियंते आणि डॉक्टरांचे सेवाभिलेख (सर्व्हिस रेकॉर्ड) तपासून, त्यांच्या शैक्षणिक पदव्यांची संबंधित विद्यापीठे आणि संस्थांकडून थेट पडताळणी केली जाईल.

सर्व विभागांनी ही तपासणी प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची समजून याचा सविस्तर अहवाल नगर अभियंता मध्यवर्ती कार्यालयाकडे तत्काळ (उलटटपाली) पाठवावा, असे आदेश देण्यात आले आहेत. या धडक कारवाईमुळे बनावट कागदपत्रांच्या आधारे पालिकेत दडून बसलेल्या इतर संशयित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणणार आहेत.