विज्ञान रंजन – ‘लाख’मोलाचा जीव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आता बराचसा पत्रव्यवहार तसंच अनेक गोष्टी ‘ई’ माध्यम पिंवा कुरिअरसारख्या संस्थांमार्फत होत असतात. ही सारी कामगिरी पूर्वी पोस्ट खात्याला करावी लागायची. त्या काळात एखादं महत्त्वाचं पत्र पिंवा वस्तू पाठवायची असेल तर ती लाखेचं ‘सील’ लावून बंद केली जायची. पाकीट अथवा लिफाफा बंद करण्याच्या सीमेवर दोन्हीकडे अर्धा-अर्धा उमटेल असा लाखेचा वापर करून उमटवलेला लालसर जाड शिक्का पाहताना कुतूहल वाटायचं. एरवीची पत्रं, पाकिटं साधी चिकटवलेली असायची. मात्र लाखेत उमटून घट्ट झाल्याने मधेच कुणी पाकीट, पार्सल उघडणार नाही याची शाश्वती लाभत असे. तसं केलं तर ‘लाख’ तुटणार आणि तसा प्रयत्न उघडकीस येणार, कारण त्याच शिक्क्याची लाख पुन्हा तशीच चिकटवणं शक्य नसायचं.

असे सीलबंद केलेले ‘लखोटे’ कागदी तसंच कापडीही असायचे. त्यासाठी मांजरपाटाचं (म्हणजे मॅन्चेस्टरचं) कापड वापरलं जायचं. ‘लखोटा’ हा पाकिटासाठीचा शब्दही लाखेवरून आला होता. लाखेचं ‘सील’ असलेला तो लखोटा. आता हा ‘हरवलेला’ शब्दही सापडणं कठीण. आता असे लखोटे अतिमहत्त्वाच्या संदेश-माहितीसाठी वापरले जातात. पण लहानपणी, क्वचितच आलेल्या अशा लखोटय़ांवरचे जाड लाखेचे एम्बॉस केल्यासारखे शिक्के असलेला पाकिटाचा भाग जतन करण्याचा छंद काहीजण जोपासत.

हे एवढं सांगण्याचं कारण, आजचा विषय ‘लाख’ मोलाचा. म्हणजे ज्याच्यापासून ही लालसर-काळपट लाख तयार होते त्या कीटकाचा. निसर्गाच्या कलाकृतीने किती किती विस्मयकारी सजीव निर्माण केलेत याची आपल्याला जाणीवही नसते. काजव्याचा शीतल प्रकाश त्याचा स्वतःचा असतो. इतका ‘स्वयंप्रकाशी’ जीव दुसरा नसेल. त्याविषयी एकदा सविस्तर जाणून घेऊ. परंतु घट्ट ‘लाख’ कोणता किडा तयार करतो? का करतो? अशा प्रश्नांच्या उत्तरासाठी त्या जिवाची जीवनशैली आणि जैविक चक्र (लाइफ सायकल) यामागचे एक विज्ञान जाणून घेणं महत्त्वाचं तसेच कुतूहलाचंसुद्धा!

आपल्याकडे इसवी सनपूर्व 1200 पासून ‘लाख’ हा नैसर्गिक पदार्थ केवळ लिफाफाबंदी ‘सील’ म्हणून नव्हे, तर मोठय़ा प्रमाणात ‘पॉलीश’ करण्यासाठीही वापरला जायचा. संस्कृतमध्ये या त्वरित ज्वालाग्रही पदार्थाला ‘लाक्षा’ म्हणतात. महाभारतात पुरोचनाने काwरवांच्या सांगण्यावरून, पांडवांच्या नाशासाठी दुष्ट हेतूने ‘लाक्षागृह’ बांधून घेतल्याची कथाही येते. याचा अर्थ हा पदार्थ त्यावेळी विपुल प्रमाणात उपलब्ध असावा.

‘लाख’ लाल-काळी अशा दोन प्रकारची असते. आमच्या शंभर-सव्वाशे वर्षांपूर्वीचा पह्नोग्राम होता. त्यावर मेणाचीच तबकडी ‘गाणं’ वाजवायची आणि त्या ‘पह्नो’च्या पेटीचे जाड-पॉलिश काळसर लाल लाखेचे होते! याशिवाय हा पदार्थ त्याकाळी सौंदर्यप्रसाधनातही वापरला जायचा.

युरोपात ‘लाखे’चा वापर साधारण सतराव्या शतकात सुरू झाला, तो पोस्ट खात्याच्या स्थापनेनंतर आणि त्यापूर्वीही खलिते, लखोटे ‘सील’ करण्यासाठी. हे ‘सील’ म्हणजे त्या सत्तेची हमी-मुद्रा. तसा वापर आपल्या देशातही होत होताच. एकेकाळी नैसर्गिक पद्धतीने मिळणारी लाख नंतर रासायनिक प्रक्रियेतून कारखान्यात तयार होऊ लागली.

नैसर्गिक लाख हे ‘केरिआ लॅक्का’ या ‘स्केल’ पद्धतीच्या किटकांचं संरक्षण कवच तयार करणारं लाल मेण. मधमाशा जसं त्यांच्या शारीरिक स्रावातून मेण बनवून मध भरलेलं पोळं बंद करतात. तसे कोरिआ लॅक्का कीटक लिबलिबिट शरीराचे आणि झाडांवर वाढणारे असतात. त्यांची वाढ झाली की ते फांदीवर लांबलचक संरक्षित वसाहत तयार करतात आणि त्याची ‘तटबंदी’ असते लाखेची!

केरिआ लॅक्का ‘स्केल फॅमिली’तले असले तरी ते थोडे वेगळे बीटलसारखे दिसतात. ती स्केल प्रजातीमधली ‘कॉकोइडिया’
सुपरफॅमिली. पूर्ण वाढीचे हे केरिआ जीव शारीरिक स्रावातूनच घट्ट असा रंगीत द्राव निर्माण करत, चिलटांसारख्या सूक्ष्म जिवांना भक्ष्य करत आपली सरपटणारी पिंवा (रांगणारी) वस्ती फांदीवर पसरत जातात. लाखेमुळे तयार होणाऱया पोकळ टय़ुबमध्ये ते राहतात. आत्मरक्षणाची ही कला त्यांना निसर्गाने विचारपूर्वक नव्हे तर उपजत बहाल केलेली असते. अनेक कीटक, प्राणी, पक्षी त्यांची जी ‘घरटी’ बनवतात, त्यामागे नैसर्गिक ऊर्मी (नॅचरल इन्सिंक्ट) असते. म्हणूनच लाखो वर्षांत त्यांच्या घरबांधणीत फारसा फरक पडत नाही.

लाखेचा रंग साधारण लाल (मरुन-रेड) असला तरी पिवळा, (यलो) आणि काळाही असतो. तो त्या उपप्रजातीच्या कीटकावर अवलंबून असतो. लॅक रेझीन हे एकमेव जैविक आणि नैसर्गिक पॉलिमर आहे. (रेझीनला पूर्वी मेणकापड म्हणत) त्याचा उच्चार कोणी रेक्झिन असाही करायचे.)

अशी ही सुंदर रंगाची लाख एका अक्षरशः ‘लाख’ मोलाच्या जिवापासून बनायची. पुढे सिन्थेटिक (कृत्रिम) लाख बनवली जाऊ लागल्यावर नैसर्गिक रेशमाप्रमाणेच लाखेलाही विपुल प्रमाणात निर्माण केला जाणारा पर्याय उपलब्ध झाला. मात्र ‘लाखे’ची ‘कुळ’कथा ही अशी.

विनायक