
विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांविषयी व सरकारी नोकऱ्यांबाबत योग्य दिशा, माहिती मिळावी यासाठी भायखळय़ात ‘मिशन ऑफिसर’ या भव्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आयएएस अपॅडमी, शिव विद्या प्रबोधिनी आणि प्रवाह फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राणीची बाग येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाटय़गृहात हा उपक्रम आयोजित केला होता. या शिबिरात 650हून अधिक विद्यार्थी व पालकांनी सहभाग घेतला होता.
शिवसेना उपनेते व आमदार मनोज जामसुतकर व प्रवाह फाऊंडेशन विश्वस्तांच्या पुढाकाराने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात आयपीएस अधिकारी डॉ. रवींद्र शिसवे, प्रा. संजय मोरे, शिव विद्या प्रबोधिनीचे अध्यक्ष विजय कदम व प्रा. अभिमन्यू महाजन यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेतील अनुभव, स्पर्धा परीक्षांची तयारी, ध्येयनिश्चिती, सातत्य, शिस्त आणि मेहनतीचे महत्त्व समजावून सांगितले. तसेच एमपीएससी, यूपीएससी व विविध शासकीय स्पर्धा परीक्षा कोणत्या, त्यांचे स्वरूप काय, त्यासाठी पात्रता व तयारी कशी करावी आणि योग्य करिअरची निवड कशी करावी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर नगरसेविका सोनम जामसुतकर, भायखळा महिला विधानसभा संघटक चंदना साळुंखे आणि प्रवाह फाऊंडेशनचे विश्वस्त मितेश जामसुतकर उपस्थित होते.



























































