
तापाचे इंजेक्शन दिल्यानंतर तरुणाची प्रकृती खालावली आणि पाच मिनिटांत त्याचा मृत्यू झाला. यानंतर बोगस डॉक्टर घटनास्थळावरून फरार झाला. पोलिसांनी तरुणाचा मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. रत्नेश (32) असे मयत तरुणाचे नाव आहे. शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचे नेमके कारण समोर आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यात ही घटना घडली. रत्नेशला काही काळापासून ताप होता. त्याच्यावर उपचार करण्यासाठी कुटुंबीयांनी नागला हिम्मत येथील एका स्थानिक व्यक्तीला बोलावले, जो मेडिकल स्टोअर चालवतो आणि घरी येऊन उपचारही करतो. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, त्या व्यक्तीने रत्नेशला तापाच्या उपचारासाठी इंजेक्शन दिले. इंजेक्शन दिल्यानंतर लगेचच त्याची प्रकृती खालावली. कुटुंबीयांनी त्याला तातडीने अलिगंज येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात नेले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदन अहवालानंतरच तरुणाच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल.
























































