नेपाळच्या जलप्रलयातून संगमनेरचे 45 पर्यटक सुखरूप ! अयोध्या, वाराणसी, प्रयागराजचा प्रवास करत 2 सप्टेंबरला संगमनेरमध्ये परतणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नेपाळमधील जलप्रलयामुळे मार्ग बंद झाल्याने अडचणीत सापडलेले संगमनेर परिसरातील 45 पर्यटक सुखरूप बाहेर पडले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या सहकार्याने पर्यायी मार्गाने लुंबिनीहून अयोध्येत पोहोचले असून, आता प्रयागराज व वाराणसीचा प्रवास करून मंगळवारी (दि. 1) रात्री संगमनेरकडे रवाना होणार आहेत. बुधवारी (दि. 2) रात्री ते संगमनेरमध्ये पोहोचतील, अशी माहिती साहित्यिक हिरालाल पगडाल, टूर आयोजक निर्मला गुंजाळ यांनी दिली.

निर्मला गुंजाळ यांच्या माध्यमातून 24 ऑगस्टला हा समूह नेपाळसह अयोध्या, वाराणसी व प्रयागराज पर्यटनासाठी रवाना झाला होता. चितवनपर्यंत सर्व पर्यटक सुरक्षित पोहोचले, मात्र काठमांडूकडे जाणारे मार्ग बंद झाल्याने नियोजित प्रवास रद्द करून पर्यायी मार्ग स्वीकारावा लागला. हॉटेल बुकिंग रद्द झाल्याने निवास भोजनाची अडचण निर्माण झाली, तर पर्यायी हॉटेल्सचे दर चारपट असल्याचे सांगण्यात आले. नेपाळमध्ये यूपीआय व्यवहार बंद असल्याने आर्थिक अडचणीही वाढल्या. समूहातील सुमारे 80 टक्के पर्यटक 60 वर्षांवरील आहेत.

या समूहात संगमनेर, अकोलेसह अहिल्यानगर जिल्ह्यातील 25, तसेच पारनेर, नाशिक व पुणे परिसरातील पर्यटकांचा समावेश आहे. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्र सरकारकडून प्रयत्न करण्यात आले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार अमोल खताळ व आमदार सत्यजित तांबे यांनी संपर्क साधून पर्यटकांची विचारपूस केली. काळजी घेण्याचे आवाहन केले.