
नेपाळमध्ये 26 ऑगस्टला आलेल्या भीषण पुरातून छत्तीसगडमधील पाच मित्र थोडक्यात बचावले. चहासाठी घेतलेल्या अवघ्या 10 ते 15 मिनिटांच्या विश्रांतीमुळे त्यांचे प्राण वाचले. त्यांनी थोडा वेळ आधी प्रवास सुरू ठेवला असता, तर भोटे कोशी आणि त्रिशुली नदीच्या खोऱ्यात आलेल्या महापुरात त्यांचे काय झाले असते, याचा विचारही अंगावर काटा आणणारा आहे.
नारायण सेन, दिनेश ओझा, प्रेम सिंग जगत, यतेंद्र प्रकाश आणि दिनेश सिंग ठाकूर हे पाचही मित्र रायपूरमधील माना कॅम्प परिसरातील रहिवासी असून ते 50 ते 60 वयोगटातील आहेत. 21 ऑगस्टपासून रायपूरहून नेपाळच्या प्रवासाला निघाले होते. दुसऱ्या दिवशी ते नेपाळमध्ये पोहोचले. त्यांनी कार भाड्याने घेतली होती. पशुपतीनाथ मंदिर, मनकामना मंदिरासह विविध पर्यटनस्थळांना भेट देण्याचा त्यांचा बेत होता.
एनडीटीव्ही ने दिलेल्या वृत्तानुसार 26 ऑगस्टला सकाळी साडेनऊ ते दहाच्या सुमारास हे मित्र धाडिंग जिल्ह्यातील मालेखू शहरातील एका हॉटेलमध्ये चहासाठी थांबले. याच छोट्याशा विश्रांतीने त्यांच्या आयुष्याला वेगळे वळण दिले. नारायण सेन यांनी सांगितले की, “आम्ही चहासाठी थांबलो होतो, हे आमचे नशीबच म्हणावे लागेल. आम्ही 10-15 मिनिटे आधी तिथून निघालो असतो, तर कदाचित पुरात अडकलो असतो. हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर त्यांना पुढे असलेला एक पूल पुराच्या पाण्यामुळे वाहून गेल्याचे समजले. विशेष म्हणजे, हॉटेल एका भारतीय व्यक्तीचे होते. त्यांनी या पाचही मित्रांना मदत केली आणि जेवणाचीही व्यवस्था केली.
पूरपरिस्थिती इतकी भयावह होती की, या मित्रांनी त्रिशुली नदीत गाड्या वाहून जाताना पाहिल्या. पुराच्या पाण्यासोबत मृतदेह आणि अनेक वस्तूही वाहून जात होत्या. आम्ही गाड्या नदीत वाहून जाताना पाहिल्या. मृतदेह आणि इतर वस्तूही प्रवाहासोबत वाहत होत्या. आम्ही खूप घाबरलो होतो. परिस्थिती आणखी बिघडेल की काय, अशी भीती सतत वाटत होती, असे सेन यांनी सांगितले. यानंतर त्यांनी मालेखू येथील एका उंचावरील सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला. त्या रात्री त्यांनी गाडीतच मुक्काम केला. स्थानिक नागरिक आणि प्रशासनानेही त्यांना मदत केली.
पोलीस हेड कॉन्स्टेबल असलेले दिनेश सिंग ठाकूर यांनी सांगितले की, पूर आला तेव्हा ते पशुपतीनाथ मंदिरापासून सुमारे 50 किलोमीटर अंतरावर होते. हॉटेलमध्ये चहा घेत असताना परिसरातील लोकांमध्ये अस्वस्थता जाणवत होती. काही वेळातच पुरामुळे झालेल्या विध्वंसाची माहिती त्यांना मिळाली. अनेक गावे, इमारती, कार्यालये आणि जलविद्युत प्रकल्प उद्ध्वस्त झाल्याचे त्यांनी पाहिले आणि ऐकले. नंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी त्यांनी त्रिशुली नदीच्या काठावर जाऊन पाहणी केली. आम्ही जे पाहिले, त्याचे शब्दांत वर्णन करणे खूप कठीण आहे. आम्ही सतत भगवान शिवाचा नामजप करत होतो. त्यांच्याच आशीर्वादाने आमचे रक्षण झाले, असे आम्हाला वाटते, असे ठाकूर म्हणाले.
पूरामुळे परिसरातील वीज आणि पाणीपुरवठाही विस्कळीत झाला होता. मात्र स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी या हिंदुस्थानी पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी राहण्यास मदत केली. प्रशासनाने त्यांना उंच आणि सुरक्षित ठिकाणी असल्याने काळजी करण्याची गरज नसल्याचे सांगितले. या काळात त्यांनी इंटरनेटच्या माध्यमातून भारतातील कुटुंबीयांशी संपर्क कायम ठेवला. हिंदुस्थान सरकारच्या हेल्पलाइनचाही त्यांनी आपल्या ठिकाणाची माहिती देण्यासाठी वापर केला.
























































