
नेपाळमध्ये आलेल्या महापुरामध्ये त्रिशुली हा भाग पूर्णत: उद्ध्वस्त झाला. क्षणात होत्याचे नव्हते झाले. गावचे गाव, वाड्या-वस्त्या पुराच्या लोंढ्यात वाहून गेले. शेकडो लोक वाहून गेले, चिखल, दगड-धोंड्याखाली आले. आजही या पुरात वाहून गेलेल्या हजारो लोकांचा शोध सुरू असून 700 हून अधिक लोकांचे मृतदेह हाती लागले आहेत. या महाभयंकर पुरामध्ये नुवाकोट जिल्ह्यातील त्रिभुवन त्रिशुली माध्यमिक विद्यालयही जवळपास नामशेष झाले. मात्र या अत्यंत आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये शाळेच्या मुख्याध्यापकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे 1,643 विद्यार्थ्यांचा जीव वाचला.
बुधवारी सकाळी 9 वाजून 20 मिनिटांनी नेपाळमधील त्रिभुवन त्रिशुली माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र दवाडी यांना त्यांच्या एका मित्राने फोनवरून पुराचा इशारा दिला. त्यावेळी शाळेत आणि आसपास मिळून 1,643 मुले उपस्थित होती. हिमनदी कोसळल्याने आलेल्या विनाशकारी महापुराने पर्वतातील नदीप्रणाली उध्वस्त केली होती. या जलप्रचंड आपत्तीत नेपाळमध्ये 734 लोकांचा मृत्यू झाला, तर तिबेटमध्ये 16 जण जीवाला मुकले.
नदीची पातळी वेगाने वाढत होती आण पुराचे स्पष्ट संकेत मिळत होते. शाळा काँक्रीटची बनलेली आणि नदीपासून 60 मीटर उंचावर असल्याने सुरक्षित वाटत होती. परंतु एका पालकाने धावत येऊन पाण्याचा स्तर वेगाने वाढत असून नदीने गाव गिळल्याचे सांगितल्यावर राजेंद्र दवाडे यांना या नैसर्गिक आपत्तीची तीव्रता जाणवली. त्यात मित्रानेही सूचना दिल्याने राजेंद्र दवाडी यांनी वेळ न दवडता शाळेची घंटा वाजवली आणि विद्यार्थ्यांसह शिक्षकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश दिले.
दवाडे यांनी बस चालकांना फोन करून गाड्या मागे घेण्यास सांगितले. यावेळी भीतीमुळे एका मुलीला पॅनिक अटॅक आला. त्यामुळे तिला दुचाकीवरून वरच्या भागातील सुरक्षित स्थळी नेण्यात आले. तर इतर मुलांनी आणि शिक्षकांनी पायपीट करत सुरक्षित जागा गाठली.सर्व मुले अखेर एका पिंपळाच्या झाडाखाली आसऱ्याला गेली आणि पाहता पाहता पुराच्या लोंढ्यात त्यांची वाहून गेली.
शिक्षक, शिपायाचा मृत्यू
दरम्यान, विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले असले तरी पुराच्या पाण्यात वाहून गेल्या शिक्षकाचा आणि एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. शाळेमध्ये सामाजिक शास्त्र हा विषय शिकवणारे संतोष परियार (वय – 32) हे नाश्ता करण्यासाठी नदीजवळील खोलीत गेले असताना पुराच्या पाण्यात वाहून गेले. तर शाळेचा दरवाजे बंद करण्यासाठी गेलेले शिपाई सुलतान मामा यांचाही पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला.























































