
अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे आयोजित फेथ लिडर्स कॉन्फरन्समध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेल्या विधानाची चर्चा आहे. हिंदुस्थानातून मुसलमानांना हाकलून दिले पाहिजे, अशी विचारसरणी ठेवणारी कोणतीही व्यक्ती हिंदू असूच शकत नाही, असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले. यावरून राजकारण तापले असून विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधला. काँग्रेसचे राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी भागवत यांच्या वक्तव्यावर टीका करताना, केवळ शब्द नव्हे तर प्रत्यक्ष कृतीही दिसायला हवी, असे म्हटले आहे.
कपिल सिब्बल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट शेअर करून मोहन भागवत यांच्या दुटप्पी भूमिकेवर आक्षेप घेतला.विविधतेत एकता ही हिंदुस्थानची पारंपरिक विचारसरणीअसून तिचे रक्षण केले पाहिजे, असे भागवत परदेशात म्हणाले. मात्र देशात बोलताना याबाबत मौन का? परदेशात समजूतदारपणाच्या गोष्टी, पण स्वत:च्या देशात याविषय़ी काहीच बोलत नाही. शब्द महत्त्वाचे नाहीत, कृतीतून बोललं पाहिजे, अशी टीका सिब्बल यांनी केली.
Bhagwat in New York:
“Diversity is a decoration of our innate unity. It has to be protected”
Wise words abroad
Silence at homeWords don’t matter
Actions must speak !— Kapil Sibal (@KapilSibal) August 30, 2026
राशिद अल्वी यांचा सवाल
काँग्रेस नेते राशिद अल्वी यांनीही भागवत यांच्या वक्तव्यावर प्रश्न उपस्थित केला. अमेरिकेत जाऊन हिंदू मुसलमानांविषयी बोलण्याची गरजच काय होती. जर हिंदुस्थानातच हिंदू मुसलमान असा कोणताही वाद नाही मग अचानक अमेरिकेत जाऊन असे बोलण्याची गरज का भासली, असा सवाल राशिद अल्वी यांनी उपस्थित केला. भागवत हे आपली प्रतिमा सुधारण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्ये करत असल्याचा आरोपही अल्वी यांनी केला.
हिंदुस्थानात एक आणि परदेशात वेगळं हा दुटप्पीपणा, हे ढोंग
भागवत यांनी ही विधाने अमेरिकेत जाऊन करण्यापेक्षा हिंदुस्थानात, दिल्लीत आणि नागपुरात राहून करायला हवीत. हिंदुस्थानात एक भूमिका घ्यायची आणि परदेशात जाऊन दुसरीच विधानं करायची, हा दुटप्पीपणा असून ते निव्वळ ढोंग आहे. आपल्या हिंदू धर्मात अशा प्रकारच्या ढोंगाला अजिबात स्थान नाही. या देशामध्ये राष्ट्रीय एकात्मता अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे जे लोक देशात विद्वेषाचे राजकारण करत आहेत, त्यांच्या पाठीशी संघ उभा राहणार नाही, अशी स्पष्ट भूमिका सरसंघचालकांनी घेतली पाहिजे.
























































