बोलीभाषेचे जतन करणे काळाची गरज, चिपळूणात पार पडले बोलीभाषा संमेलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठी साहित्य परिषद, चिपळूण शाखा, विभा अरविंद ग्रंथालय, चिपळूण आणि श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मोतीवाले परांजपे हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्हा बोली भाषा” संमेलन आयोजित करण्यात आले होते.या काव्यसंमेलनात बोलीभाषेचा जागर करण्यात आला. संमेलनाची सुरुवात दिपप्रज्वलन आणि प्रा. यास्मिन शेख यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. सूत्र संचालन प्रा. विकास मेहेंदळे यांनी केले. प्राचार्य विजय कुलकर्णी यांनी प्रस्तावना करतांना मराठी साहित्य परिषदेच्या शंभर साहित्य संमेलन आयोजनाचा उद्देश सांगून प्रा. यास्मिन शेख यांच्या मराठी भाषेसाठी असलेल्या योगदानाचा उल्लेख केला.

संमेलनाचे अध्यक्ष प्रा. संतोष पांडुरंग गोणबरे यांनी बोलीभाषा त्यांचे महत्त्व, भाषेतील विविध शब्द, उच्चार आणि संवर्धनात असलेले महत्त्व विशद केले. दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ साहित्यिक अरुण इंगवले म्हणून उपस्थित होते. त्यांच्या अध्यक्षते खाली प्रा. मनाली बावधनकर यांनी खारवी बोली , दुर्गेश आखाडे यांनी धनगरी बोली, अमोल पालये कुणबी बोली, मुझफ्फर सय्यद यांनी दालदी बोली, सुनील कदम यांनी कोळी बोली भाषा संदर्भात भाषा सौष्ठव. भाषेचा गोडवा एकच वस्तू विषयाच्या संदर्भात असलेले विविध शब्द, सण, उत्सव, समारंभात गायली जाणारी गीते आणि मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी दिलेले शब्द यांचा उल्लेख केला. अरुण इंगवले यांनी बोली भाषेतील शब्द, आणि विविध वैशिष्ट्ये सांगून बोलीभाषा अस्तित्वात राहण्यासाठी साहित्याचे जतन- संवर्धन करण्यासाठी सर्व बोलीभाषा अभ्यासकांनी एका व्यासपीठावर येऊन बोलीभाषेचा प्रचार, प्रसार, प्रसिद्धी आणि अभ्यास केला पाहिजे आणि त्यामध्ये युवकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. प्रा.कैलास गांधी यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन झाले.वेदिका विष्णू हरवडे , वैष्णवी गजानन हळदे यांनी स्वरचित कविता सादर केल्या. या बरोबरीने रुपाली पाटील, माधुरी खांडेकर, विशाखा चितळे, सुनील कदम, मुझफ्फर सय्यद, विजय कदम, राष्ट्रपाल सावंत, संदीप परुळेकर, प्रा संदीप येलंये, प्रा विक्रांत टेरवकर यांनी कविता सादर केल्या.

शेवटच्या सत्रात लेखक आपल्या भेटीला या सत्राच्या अध्यक्षस्थानी श्री. विजय कदम होते. लेखक राजा बर्वे यांनी त्यांच्या “इरसाल कोकण रंग ” या पुस्तकातील इरसाल कोकणी माणसांच्या जीवंत व्यक्तिरेखा साकारताना बोली भाषेचे महत्त्व विशद केले. सौ प्रीतम खामकर यांनी “उंबरठ्यावरची दिवाळी” ही कथा सादर केली. कार्यक्रमाला प्राचार्य बाळासाहेब यादव, डॉ. उमेश कुमार बागल, धीरज वाटेकर, सुहास चव्हाण, बापू काणे तसेच आनंदराव पवार महाविद्यालय, डॉ. तात्यासाहेब नातू महाविद्यालय, ज्ञानदीप महाविद्यालय येथील प्राध्यापक विद्यार्थी आणि सन्माननीय लेखक कवी आणि नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमांचे आभार प्रदर्शन प्रा. विकास मेहेंदळे यांनी केले.